बहुगुणी डेस्क, वणी: वणी येथील वरोरा रोडवरील द फोन झोन या मोबाईल शॉपीला पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत लाखोंचे मोबाईल व असेसरीज जळून खाक झाली. सुमारे दोन तास ही आग सुरु होती. पहाटे 5 वाजताच्या सुमारास ही आग आटोक्यात आणण्यात फायर ब्रिगेडला यश आले. या दुर्घटनेत कोणतीही जीवतहानी झाली नसली तरी दुकानात विक्रीसाठी ठेवलेले सर्व मोबाईल व सर्व असेसरीज जळाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
वणी येथील वरोरा रोडवर लोटी महाविद्यालयाजवळ द फोन झोन या नावाने मोबाईल शॉपी आहे. आज सोमवारी दिनांक 25 ऑगस्ट रोजी पहाटे तीन तीन वाजताच्या सुमारास या दुकानातून धूर निघत असल्याचे शेजा-यांच्या लक्षात आले. शेजा-यांनी याची माहिती तातडीने दुकान मालक संजोग कपूर व फायरब्रिगेडला दिली. संजोग हे तातडीने घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत आगीत दुकानातील जवळपास सर्वच माल जळालेला होता. ही आग इतकी भीषण होती की फायरब्रिगेडच्या दोन गाड्या आग विझवण्यासाठी आल्या होत्या.
दुकानात विविध किमतीचे मोबाईल तसेच शेकडो पॉव्हरबँक, मोबाईल चार्जर, 12 हजारांपेक्षा अधिक मोबाईल कव्हर तसेच इतर असेसरीज होत्या. आगीत कितीचे आर्थिक नुकसान झाले याची माहिती नसली तरी यात लाखो रुपये किमतीचा माल जळून भस्म झाल्याचे बोलले जात आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज सध्या व्यक्त केला जात आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी घटनेचा पंचनामा केला. (पाहा घटनेचा थरारक व्हिडीओ…)



Comments are closed.