पालिकेचे पथक रस्त्यावर, 20 जनावरं घेतली ताब्यात

मनसेचे अंकुश बोढे यांच्या ढोरकी आंदोलनानंतर पालिका प्रशासन ऍक्शन मोडवर

बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील मोकाट जनावरांमुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. तसेच अपघात देखील सुरु होते. याविरोधात मनसेने पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी ‘ढोरकी’ आंदोलन केले होते. मनसे नेते राजू उंबरकर यांच्या मार्गदर्शनात व शहराध्यक्ष अंकुश बोढे यांच्या नेतृत्त्वात झालेल्या या आंदोलनात नगर पालिकेत जनावरं सोडण्यात आले होते. यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले. रविवारी रात्री पालिका प्रशासनाने मोहीम सुरु करत सुमारे 20 ते 22 जनावरांना ताब्यात घेत त्यांची रवानगी कोंडवाड्यात केली. पालिकेच्या मोकाट जनावरांविरोधातील कार्यावाहीमुळे वणीकर समाधान व्यक्त करीत आहे.

गुरुवारी मनसे तर्फे वणी शहरात ढोरकी आंदोलन करण्यात आले होते. यात मनसे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी ढोरकीचा अवतार धारण करीत शहरातील जनावरं हाकलून नगर पालिकेत सोडली होती. त्यानंतर पालिका प्रशासनातर्फे कार्यवाहीचे आश्वासन देण्यात आले होते. पोळा व तान्हा पोळा असल्याने रविवारी दिनांक 24 ऑगस्ट रोजी रात्री पालिकेच्या पथकाद्वारे कार्यवाहीस सुरुवात झाली. मध्यरात्री 2 वाजेपर्यंत ही कार्यवाही सुरु होती. अखेर 20 ते 22 जनावरांना या पथकाने ताब्यात घेत त्यांची रवानगी कोंडवाड्यात केली.

अन् मध्यरात्री पोहोचले पोलिसांचे पथक
पालिकेचे पथक रात्री हाती दंडे घेऊन कार्यवाहीस निघाले. हाती दंडे घेऊन धावतानाचे चित्र पाहून अनेकांचा गोंधळ उडाला. अनेकांना शहरात काही विपरीत तर घडले नाही असा समज झाला. त्यामुळे अनेकांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचल्यावर मोकाट जनावरांबाबत मोहीम असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलीस पथकानेही सुटकेचा श्वास सोडला. दरम्यान ताब्यात घेतलेल्या जनावरांची कोंडवाड्यात किंवा गोरक्षण संस्थेकडे रवानगी करण्यात येईल. त्यामुळे शहरात मोकाट जनावरं सोडू नये, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मोहीम नियमीत सुरु ठेवावी – अंकुश बोढे
शहरातील मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा येत होता. नागरिकांचा जीव धोक्यात येत होता. याविरोधात मनसेने केलेल्या ‘ढोरकी आंदोलनाला’ अखेर यश मिळाले असून पालिका प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. ही मोहीम नियमितपणे चालू राहिली तर नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. वणीकरांच्या सुरक्षेसाठी आणि शहराच्या स्वच्छतेसाठी मनसे सदैव सज्ज आहे. – अंकुश बोढे, शहराध्यक्ष मनसे

आणखी एक आठवडा वाढली ऑफर… प्रत्येक फर्निचरवर घसघशीत सूट

Comments are closed.