बहुगुणी डेस्क, वणी: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आगामी नगरपालिका व जिल्हापरिषद निवडणुका लक्षात घेऊन जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. रविवार, दि. 24 ऑगस्ट रोजी शेतकरी मंदिर, वणी येथील कार्यक्रमात विविध पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला. या सोहळ्यात मनसे नेते राजू उंबरकर यांनी विरोधकांवर जबरदस्त प्रहार केला. जात पाहून उमेदवार निवडले जातात, पण कामासाठी लोक जात न बघता मनसेकडे येतात, कारण मनसे कधीच जातीपातीच्या राजकारणाला थारा देत नाही.” असे ते म्हणाले.
या वेळी मनसेने वणी तालुक्यातील 100 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करून जंबो कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये तालुका उपाध्यक्ष, सचिव, संघटक, विभाग अध्यक्ष आणि उपविभाग अध्यक्षांचा समावेश आहे. तसेच कार्यक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी रमेश पेचे, जिल्हा उपाध्यक्षपदी महेश हातगावकर, तर व्यापारी सेनेच्या शहर अध्यक्षपदी राकेश वैद्य यांची नियुक्ती झाली. नव्या बळामुळे मनसे निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उंबरकर म्हणाले, “निवडणुकीतील पराभवाने हिम्मत हरवू नका, नव्या जोमाने कामाला लागा. मनसे पूर्ण ताकदीने लढणार आहे.” विरोधकांवर निशाणा साधताना ते म्हणाले की केवळ जात पाहून उमेदवार निवडले जातात, पण मनसे कामावर भर देते, म्हणूनच लोक आमच्याकडे आकर्षित होत आहेत.

कार्यक्रमाचे नियोजन तालुका अध्यक्ष फाल्गुन गोहोकार आणि शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी केले. यावेळी इरशाद खान, संतोष रोगे, अर्चना बोदाडकर, अंजुम शेख, रमेश पेचे, विलन बोदाडकर, बंडू येसेकार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन हरीश कामारकर यांनी, प्रस्ताविक फाल्गुन गोहोकार यांनी, तर उपस्थितांचे आभार अंकुश बोढे यांनी मानले.



Comments are closed.