बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील गौराळा गावात रस्त्यावर बैलबंडी ठेवण्याच्या वादातून एका शेतकऱ्याला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना रविवार, दि. 24 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध मारेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
फिर्यादी जंगलु शंकर कुचनकार (वय 55, रा. गौराळा) हे रविवारी सकाळी गोठ्याजवळ काम करीत होते. दरम्यान तिथे नरेश आत्राम (वय 40) हा मंगेश पूनम टेकाम (वय 30) हे आले. नरेशने “बैलबंडी रस्त्याच्या मधोमध ठेवू नको, आम्हाला अडचण होते,” असे म्हणत जंगलूशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादातून नरेशने काठीने जंगलू यांच्या डाव्या हातावर प्रहार केला. त्याचवेळी मंगेश पुनम टेकाम (वय 30) याने फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीला शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेनंतर जंगलु यांनी मारेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. जंगलूची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी नरेश आत्राम आणि मंगेश टेकाम यांच्यावर बीएनएसच्या कलम 118(2), 3(5), 351(2), 351(3), 352 नुसार गुन्हा नोंदवला. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.


Comments are closed.