बँकेतून काढलेल्या दीड लाखांवर चोरट्याने मारला डल्ला

शेवाळकर परिसरातील घटना, पैसे काढल्यानंतर सावधान – भामटे टपलेले असतात !

बहुगुणी डेस्क, वणी: बँकेतून काढलेले पैसे डिक्कीत ठेवणे एकाला चांगलेच महागात पडले. दीड लाखांच्या रकमेवर अज्ञात चोरट्याने डल्ला मारला. सोमवारी दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास वणीतील राम शेवाळकर परिसर येथे ही घटना घडली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, बंडू तुकाराम बानकर (55) हे छोरिया ले आऊट गणेशपूर (वणी) येथील रहिवासी असून ते प्रॉपर्टी डिलिंगचे काम करतात. त्यांचे वणीतील बँक ऑफ बडोदा या बँकेत खाते आहे. सोमवारी ते त्यांच्या मित्रासह बँकेत गेले. त्यांनी चेकद्वारा दीड लाखांची रक्कम काढली. त्यांनी सदर रक्कम त्यांच्या टीव्हीएस कंपनीच्या इलेक्ट्रीक मोपेडच्या (MH29 CA7098) डीक्कीत ठेवली. त्यानंतर ते मित्राला घरी सोडून त्यांच्या घरी देखील गेले. त्यानंतर चार वाजताच्या सुमारास ते काही कामानिमित्त शेवाळकर परिसर येथे गेले. तिथे त्यांनी रजिस्ट्रार कार्यालयासमोर दुचाकी लावली व ते एका कार्यालयात गेले. 

काही वेळाने ते कार्यालयातून परत आले. मात्र त्यांना डिक्कीतील काही कागदपत्रे खाली पडलेले आढळले. त्यामुळे त्यांना संशय आला. त्यांनी डिक्की चेक केली असता त्यांना डिक्कीतील दीड लाखांची रक्कम चोरीला गेल्याचे समजले. त्यांनी संपूर्ण परिसरात चोरट्याचा शोध घेतला. परिसरातील सीसीटीव्ही चेक केले. अखेर त्यांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात बीएनएसच्या कलम 303 (2) नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पैसे काढल्यानंतर सावधान – भामटे टपलेले असतात !
बँकेतून काढलेल्या रकमेवर भामट्यांचे क्षणोक्षणी लक्ष असते. ते बँकेतून मोठी रक्कम काढलेल्या व्यक्तींचा पाठलाग करतात व संधी मिळताच पैसे लुटतात. एखादी शंभर किंवा पाचशेची नोट रस्त्यावर फेकून सदर पैसे उचलायला भाग पाडतात. दरम्यान त्याच्याजवळ असलेली किंवा डिक्कीत ठेवलेली रक्कम लुटून नेतात. वणीत अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. बँकेतून काढलेली रोख रक्कम किंवा मौल्यवान वस्तू दुचाकीच्या डीक्कीत ठेवून कुठेही जाऊ नये. अशाने चोरीचा धोका जास्त असतो, आणि चोरटे अशा संधीचा फायदा घेऊ शकतात. कुणी संशयास्पद आढळल्यास याची माहिती पोलिसांना द्या.

आणखी एक आठवडा वाढली ऑफर… प्रत्येक फर्निचरवर घसघशीत सूट

Comments are closed.