मनसेचा इशारा आणि महावितरण कार्यालयातील लिफ्ट सुरु
मनसेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांच्या लढ्याला यश
बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरातील महावितरणच्या नवी कार्यालयात जाण्यासाठी ग्राहकांना तीन माळे चढावे लागत होते. सदर ठिकाणी लिफ्ट नसल्याने वृद्ध, दिव्यांग यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत मनसे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देत इशारा दिला होता. त्यानंतर आता दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टची सुविधा तातडीने सुरू करण्यात आली आहे. यामुळे वृद्ध, दिव्यांग आणि सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काही दिवसांपूर्वी वणीतील महावितरणचे शहर क्रमांक 2, ग्रामीण कार्यालय आणि कार्यकारी अभियंत्यांचे कार्यालय नवीन इमारतीत स्थलांतरित झाले होते. मात्र, बिल दुरुस्ती आणि इतर महत्त्वाचे विभाग तिसऱ्या मजल्यावर असल्याने वृद्ध आणि दिव्यांग ग्राहकांना पायऱ्या चढण्यात प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत होता, शिवाय पार्किंगचीही पुरेशी सोय उपलब्ध नव्हती. या समस्यांनी ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती.
या परिस्थितीची दखल घेऊन मनसेने पुढाकार घेतला. मनसेचे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन या गैरसोयींवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. मनसेने दोन पर्याय सुचवले: किंवा संपूर्ण कार्यालय तळमजल्यावर हलवावे, किंवा तिसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्ट आणि पार्किंग सुविधा उपलब्ध करावी. निवेदनात मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. मनसेच्या दबावामुळे महावितरण विभागाने तातडीने कारवाई करत लिफ्ट सुविधा सुरू केली.
या निर्णयाचे नागरिकांकडून स्वागत होत असून, मनसेच्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी मनसेचे मयुर घाटोळे, शंकर पिंपळकर, वैभव पुराणकर, योगेश ताडम, अहमद रंगरेज, सूरज तडस, कृष्णा निमसटकर, कृष्णा कुकडेजा, रितिक मोहुर्ले, आकाश घुमे, प्रेम आत्राम, दर्शन दाभेकर, राजकुमार रोगे, जुबेर खान, शाहुल असमवार, हनी बत्रा आदी कार्यकर्ते उपस्थित होते. मनसेने ग्राहकांच्या हितासाठी पुढेही कार्य करत राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.



Comments are closed.