मनसेच्या पुढाकाराने प्रगती नगर येथील रस्ता मोकळा, गटारचे काम पूर्ण

शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी केला सातत्याने पाठपुरावा

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील प्रगती नगर भागातील रहिवाशांना गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावरील अपूर्ण गटार कामामुळे त्रास सहन करावा लागत होता. गटारातून सांडपाणी रस्त्यावर येणे, खड्डे आणि डबकी साचणे यामुळे नागरिकांची ये-जा अवघड झाली होती. विशेषतः पावसाळ्यामुळे ही समस्या अधिकच गंभीर बनली होती. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मनसेने पुढाकार घेतला होता. शहराध्यक्ष अंकुश बोढे यांच्या नेतृत्त्वात याबाबत निवेदन देऊन तसेच त्याचा पाठपुरावा करण्यात आला होता. सोमवारी नगर पालिकेतर्फे गटारचे काम पूर्ण करण्यात आले व रस्ता ही मोकळा करण्यात आला. त्यामुळे प्रगती नगरवासीयांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. 

प्रगती नगर येथील ब्रह्माकुमारी जवळील बागेजवळील रस्त्याच्या शेजारील गटाराचे काम अपूर्ण होते. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर साचून तिथे झाडे झुडपं वाढली होती. त्यामुळे हा रस्ता बंद झाला होता. स्थानिक रहिवाशांनी त्यांची व्यथा मनसे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यांनी तातडीने या समस्येची दखल घेऊन नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली. बोढे यांनी परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करत रस्ता आणि गटार काम पूर्ण करण्याची मागणी केली.

मुख्याधिकाऱ्यांनी या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत जेसीबी आणि आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. त्यानंतर प्रगती नगरमधील अंतर्गत गटाराचे काम पूर्ण करण्यात आले, तर रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवून रस्ता पुन्हा सुस्थितीत आणला गेला. हा रस्ता बागेत जाण्यासाठी वापरला जातो. तसेच हा रस्ता थेट हायवेला देखील जुडतो. त्यामुळे नागरिकांना चांगला दिलासा मिळाला आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या जलद आणि प्रभावी उपाययोजनांमुळे प्रगती नगरच्या नागरिकांनी मनसेच्या प्रयत्नांचे स्वागत केले आहे. यावेळी मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

Comments are closed.