टिळकांच्या पुतळ्यासमोरील अतिक्रमण काढण्याची मागणी
अतिक्रमण न काढल्यास युवासेना स्टाईल आंदोलनाचा अल्टिमेटम
विवेक तोटेवार, वणी: वणी शहरातील टिळक चौकातील बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्यासमोरील परिसरात झालेल्या अतिक्रमणाविरोधात युवासेनेने नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. 4 दिवसांत अतिक्रमण काढण्याची कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
वणीच्या मध्यवर्ती टिळक चौकात पोस्ट ऑफिसच्या भिंतीलगत असलेला टिळकांचा पुतळा अतिक्रमणामुळे वेढला गेला आहे. या अतिक्रमणामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, नागरिकांच्या भावना दुखावल्या जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
युवासेनेने निवेदनात नमूद केले की, यापूर्वी अनेक वेळा विनंती करूनही केवळ थातूरमातूर कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान नगरपरिषद कर्मचाऱ्यांकडून दूजाभाव होत असल्याचा आरोपही करण्यात आला. काही व्यावसायिकांशी नगरपरिषदेच्या अतिक्रमण हटाव पथकाचे हितसंबंध असल्याचा आरोपही युवासेनाने केला आहे.
“4 दिवसांत अतिक्रमण हटविण्याची कारवाई न झाल्यास युवासेना कार्यकर्त्यांसह तीव्र आंदोलन करेल,” असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. निवेदन देताना युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, मनोज वाकटी, कुंदन पेंदोर, सोनू नरड, लखन आत्राम, गौरव पांडे, निखिल मडावी आदी उपस्थित होते.



Comments are closed.