महिलांचा राडा…. हाती पाईप, रॉड घेऊन महिलांची टोळी शिरली बारमध्ये

बार मालकाच्या डोळयात मिरची पूड फेकत मारहाण, मॅनेजरलाही मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: बारमध्ये महिलांची एक टोळी पाईप व लाकडी दांडा घेऊन शिरली. त्यांनी काउंटरवर असलेल्या मॅनेजरला पाईप व दांड्याने मारहाण केली तर बार मालकाच्या डोक्यात मिरची पूड फेकत मारहाण केली. ही थरारक घटना आज शनिवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास वरोरा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील न्यू ज्योती बार येथे घडली. या प्रकरणी बारमालकाच्या तक्रारीवरून 8 महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

तक्रारीनुसार, मनोज रामराव उरकुडे (41) हे शिवाजी चौक वणी येथील रहिवासी असून यांचे वरोरा रोडवर न्यू ज्योती नावाने रेस्टॉरन्ट व बार आहे. आज शनिवारी दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे बारमध्ये गेले होते. दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास 8 ते 10 महिला दोन ऑटोमध्ये बसून बार समोर आल्या. हाती प्लास्टीक पाईप व लाकडी दांडा घेऊन ही टोळी अचानक बारमध्ये शिरली. काही महिला बार काउंटरवर गेल्या तर काही महिला वरच्या माळ्यावर असलेल्या बार मालकाकडे गेल्या. त्यांनी बार मालकाच्या डोळ्यात मिरची पूड फेकली व त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तर काउंटरजवळील महिलांनी मॅनेजर आशिष खाडे याला शिविगाळ करीत मारहाण केली.

काय आहे घटनेची पार्श्वभूमी?
काल शुक्रवारी दिनांक 12 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6.30 वाजताच्या सुमारास ज्योती बार मध्ये एक तरुण (30) दारू पिण्यासाठी आला होता. सदर व्यक्ती ही राजूर कॉलरी येथील रहिवासी आहे. या तरुणाने बारमध्ये दारू पिली. मात्र त्यांच्या खिशात पैसे नव्हते. त्यामुळे तो बिल न देता तिथून निघत होता. दरम्यान वेटरच्या ही बाब लक्षात आली. त्यामुळे वेटरने त्या तरुणाला पकडले. मात्र त्याच्याजवळ पैसे नसल्याचे त्याने सांगितल्यानंतर त्याच्या एका नातेवाईकाला बारमध्ये बोलावण्यात आले. नातेवाईकाने सदर तरुणाचे बिल भरले. मात्र याचा तरुणाला राग आला. सदर तरुण उद्या काय करतो हे बघून घे, असे म्हणत बारमालकाला धमकी देऊन निघून गेला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

राडा करण्यासाठी बारमध्ये आलेल्या काही महिलांना बार मालक व मॅनेजरने ओळखले. यातील 3 महिला राजूर तर एक महिला वरोरा येथील असल्याचे समोर आले. त्यावरून मनोज उरकुडे यांनी चार संशयीत महिला व इतर 4 जणींविरोधात तक्रार दिली. तक्रारीवरून 8 आरोपींवर बीएनएसच्या कलम 189(2), 191(2)., 190, 118(1), 115(2), 296, 351(2), 351(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Comments are closed.