देशी दारू दुकान स्थानांतर विरोधात कायरवासीयांचा मोर्चा
ग्रामसभेत दारूचे दुकान हटवण्याचा ठराव, ना-हरकत न घेता दुकान सुरू
विवेक तोटेवार, वणी: कायर गावात देशी दारू दुकान सुरू केल्याच्या विरोधात बुधवारी (17 सप्टेंबर) ग्रामस्थांनी जोरदार मोर्चा काढला. तसेच आज झालेल्या ग्रामसभेत सदर दुकान हटविण्याबाबत ठरावही घेण्यात आला असून, महिलांनी यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. कायर येथील बाबापूर रोडवरच्या दारुच्या दुकानाचे काही दिवसांआधी मुकुटबन रोडवर स्थानांतर झाले आहे. याबाबत ग्रामपंचायतीची ना-हरकत न घेता दुकान सुरू करण्यात आल्याचा आरोप गावक-यांचा आहे.
सविस्तर वृत्त असे की, कायर गावातील बाबापूर रोडवर एक दारूचे दुकान होते. काही दिवसांपूर्वी हे दुकान मुकुटबन रोड येथे हलविण्यात आले. परंतु यासाठी कायर ग्रामपंचायतीची कोणतीही ना-हरकत घेतलेली नाही, असा गावकऱ्यांचा आरोप आहे. सदर दारू दुकानाच्या शेजारीच एक दवाखाना आहे. तसेच लोकवस्ती असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप आहे. इतकेच नव्हे तर दुकानासमोर असलेल्या 6 मीटर रस्त्यावर दुकान मालकाने अतिक्रमण करून पक्के बांधकाम केले असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. हा रस्ता महिलां व मुलांच्या वर्दळीचा असल्याने रहदारीलाही अडथळा निर्माण होत आहे.

या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यावर अद्याप कारवाई न झाल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे आज कायर ग्रामसभेमध्ये दारुचे दुकान हटवण्याबाबत ठराव घेण्यात आला. त्यानंतर सरपंच नागेश धनकसार यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांनी दारूच्या दुकानावर आपला मोर्चा वळवला. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली. जर दारूचे दुकान हटले नाही तर मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा आंदोलकांनी दिली.



Comments are closed.