आईवर अत्याचार करणाऱ्या नराधम मुलाला जन्मठेप

वणी तालुक्यात चार वर्षापूर्वी घडली होती ही विकृत घटना

बहुगुणी डेस्क, वणी: आईवर अत्याचार करण्याची विकृत घटना वणी तालुक्यातील एका गावात घडली होती. जुलै 2021 मध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेने समाजमन हादरून गेले होते. मात्र या प्रकरणी अत्याचार करणाऱ्या नराधम मुलाला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याबाबत गुरुवारी केळापूर कोर्टाने निकाल दिला आहे.या घटनेप्रकरणी तातडीने पुरावे गोळा करील दोषारोपपत्र दाखल केले होते. पीडितेला न्याय मिळाल्याने न्यायव्यवस्था व पोलिसांचे कौतुक होत आहे. 

ही घटना 23 जुलै 2021 रोजी वणीजवळील एका गावात घडली होती. आरोपी (तेव्हाचे वय 27) हा अविवाहित होता. तो आपल्या आईसोबत राहत होता. तो जवळच्याच एका कोल व्हॉशरीमध्ये काम करत होता. त्याला दारूचे व्यसन होते. घटनेच्या दिवशी रात्री तो कामावरून घरी परतला आणि झोपी गेला. त्यावेळी त्याची आई घरी एकटीच झोपली होती. मध्यरात्री आरोपीच्या मनात विकृत विचार जागृत झाले. त्याने आईला अश्लिल व्हिडीओ दाखवत तिच्यावर जबरदस्ती सुरु केली. मात्र आईने याला विरोध केला. मुलाने आईला पट्ट्याने मारहाण करीत तिच्यावर बळजबरी अत्याचार केला.

अस्वस्थ आईने केले विष प्राषण
जन्मदात्या मुलाकडून असे विकृत कृत्य झाल्याचे आईला सहन झाले नाही. घटनेच्या काही वेळेनंतर तिने विष प्राषण करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र सकाळी आईला वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर ती बरी झाली. मात्र मुलाने केलेले हैवानी कृत्य काही तिच्या डोक्यातून जात नव्हते. अखेर तिने पोलिसांत तक्रार देण्याचा निश्चय केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पीडित महिलेने धैर्य दाखवत वणी पोलीस स्टेशन गाठले आणि ठाणेदारांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली. या प्रकरणाच्या गांभीर्याला लक्षात घेत, पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (2) (F) (A) (बलात्कार), कलम 323 (शारीरिक इजा पोहोचवणे), आणि कलम 506 (धमकी देणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अरुण नाकतोडे यांनी केला. त्यांनी सर्व पुरावे गोळा करून सत्र न्यायालयात आरोपपत्र (चार्जशीट) दाखल केले. तपासादरम्यान अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले. ज्यामुळे या प्रकरणातील पुरावे अधिक मजबूत झाले.

या खटल्याची सुनावणी सत्र न्यायालयात झाली. पीडितेची बाजू अतिरिक्त शासकीय अभियोक्ता रमेश डी. मोरे यांनी प्रभावीपणे मांडली, तर आरोपीची बाजू ॲड. सिद्धार्थ लोढा यांनी मांडली. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष मडावी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. अनेक साक्षीदारांच्या साक्षी आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या निकालामुळे पीडितेला न्याय मिळाला आणि समाजात एक कठोर संदेश गेला.

Comments are closed.