शाळा पाडली, पण बांधकाम रखडल्याने शाळा मंदिरात

8 महिन्यांपासून केवळ पिलरचे काम... विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यातील पळसोनी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे नवीन बांधकाम गेल्या 8 महिन्यांपासून रखडले आहे. यामुळे विद्यार्थ्यांची शाळा सध्या मंदिरात भरत आहे. सध्या सण उत्सवामुळे मंदिरात होणा-या धार्मिक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येत आहे. गेले शैक्षणिक सत्र विद्यार्थ्यांनी व-हांड्यात बसून काढले. तर नवीन शैक्षणिक सत्र आता मंदिराच्या हॉलमध्ये विद्यार्थ्यांना काढावे लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण आता रामभरोसे उरले आहे. याबाबत ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समितीने गटविकास अधिकारी यांच्याकडे तात्काळ शाळेच्या बांधकामाला सुरुवात करून काम पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे. 

पळसोनी येथील जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा आहे. यात 1 ते 7 वर्ग आहेत. सुमारे 70 विद्यार्थी येथे शिकतात. जिल्हा परिषद शाळेची इमारत जिर्ण झाली होती. त्यामुळे या शाळेचे नवीन बांधकाम मंजूर झाले. जानेवारी महिन्याच्या अखेरीस शाळेच्या जुन्या वर्गखोल्या पाडण्यास सुरुवात झाली. तीन ते चार दिवसात बांधकाम पाडण्यात आले. तेव्हापासून (फेब्रुवारी) 2025 ते एप्रिल 2025 या कालावधीत विद्यार्थ्यांचे वर्ग व्हरांड्यात भरवण्यात आले. शैक्षणिक सत्र संपल्यानंतर गावक-यांना व विद्यार्थ्यांना आशा होती की उन्हाळ्याच्या सुटीच्या कालावधीत शाळेचे बांधकाम पूर्ण होईल.

नवीन शैक्षणिक सत्र सुरु झाले. मात्र बांधकामाला सुरुवातच झाली नाही. अखेर जुलै महिन्यात शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी याबाबत गटविकास अधिकारी यांना माहिती दिली. त्यानंतर ठेकेदाराने शाळेच्या कामाला सुरुवात केली. 15 दिवस काम सुरु होते. या कालावधीत बांधकामासाठी खड्डे खणून पिलर उभारण्यात आले. मात्र एवढ्या कामानंतर पुन्हा बांधकाम थांबले. जुलै 2025 पासून बांधकाम थांबलेलेच आहे. सध्या शाळेच्या परिसरात मातीचे ढिगारे पडलेले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तात्पुरती व्यवस्था आणि अडथळे
शैक्षणिक सत्र 2025-26 साठी वर्ग कोठे भरवायचे, हा प्रश्न निर्माण झाला. ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समितीने पर्यायी जागेची चाचपणी केली. त्यानंतर तात्पुरत्या व्यवस्थेसाठी गावातील विठ्ठल रुख्माई मंदिराच्या हॉलमध्ये वर्ग भरवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, मंदिरील हॉलमध्ये वर्षभर गावातील सार्वजनिक उत्सव, खाजगी कार्यक्रम आणि धार्मिक सोहळे होतात. सध्या  सण उत्सवाचा काळ असल्याने अध्ययन-अध्यापनात सातत्याने अडथळे येत आहेत. 

पावसामुळे बांधकाम रखडले – किशोर गज्जलवार, बीडीओ
खनिज निधीतून या शाळेचे बांधकाम होत आहे. सध्या पावसाळा असल्याने आणि रेतीच्या तुटवड्यामुळे शाळेचे बांधकाम थांबले आहे. शाळेचे फाउंडेशनचे काम झाले आहे. पावसाळा जाताच तातडीने शाळेचे बांधकाम पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. याबाबत संबंधीत ठेकेदाराला सूचना देण्यात आली आहे.

शाळेत शिक्षकाचीही कमतरता
या शाळेत 1 ते 4 या वर्गासाठी 2 शिक्षक तर इयत्ता 5 ते 7 साठी दोन शिक्षक उपलब्ध होते. मात्र,  शाळेच्या मुख्याध्यापिकांना केंद्रप्रमुख म्हणून पदोन्नती मिळाली. त्यानंतर आता 3 वर्गासाठी केवळ एकच शिक्षक उपलब्ध आहे. तसेच या शिक्षकावर मुख्याध्यापकाची अतिरिक्त जबाबदारी आहे. त्यामुळे पूर्णवेळ अध्यापन करणे शक्य होत नाही. याशिवाय, मध्यान्ह भोजनासाठी लागणारे धान्य आणि साहित्य जुन्या शाळेतून मंदिरात न्यावे लागते. मुख्याध्यापकाला रेकॉर्डसाठी शाळा आणि मंदिर अशी सातत्याने ये-जा करावी लागते. याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.

या सर्व समस्यांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामपंचायत आणि शाळा व्यवस्थापन समितीने गटविकास अधिकाऱ्यांना शाळेचे रखडलेले बांधकाम तातडीने पूर्ण करावे, यासह शाळेत एका अतिरिक्त शिक्षकाची नियुक्ती करावी, अशी मागणी सरपंच नलू दुधबळे, उपसरपंच पुखराज खैरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय नाईक, उपाध्यक्ष सरिता साठे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शाळाव्यवस्थापन समिती व गावक-यांनी केली आहे. याबाबत गटविकास अधिका-यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच आमदारांनाही याबाबत निवेदन देण्यात आले आहे. शिक्षण हा मूलभूत हक्क असताना, बांधकामातील विलंब आणि शिक्षकांची कमतरता यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. स्थानिकांनी प्रशासनाकडून तातडीने कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Comments are closed.