पतसंस्थेचे वैभव इमारतीत नाही तर सभासदांच्या विश्वासात – अॅड देविदास काळे
रंगनाथ स्वामी पतसंस्थेचा सभासद मेळावा मारेगाव येथे उत्साहात
पुरुषोत्तम नवघरे, वणी: सहकार क्षेत्रात भक्कम पायाभरणी करून तळागाळापर्यंत पोहोचलेल्या रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचा सभासद मेळावा मारेगाव येथे उत्साहात पार पडला. शनिवारी हा सोहळा उत्साहात पार पडला. पतसंस्थेचे वैभव इमारतीत किंवा आकड्यांत नसते, ते सभासदांच्या विश्वासात आणि सहभागात असते. असे मनोगत यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड. देविदास काळे यांनी व्यक्त केले.
मेळाव्याचे उद्घाटन सहायक निबंधक सचिन कुडमेथे यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार संजय देरकर, सहा. निबंधक सुरेश इंगोले, माजी जि.प. सभापती अरुणाताई खंडाळकर, बाजार समितीचे वसंतराव आसुटकर यांच्यासह संस्थेचे संचालक व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात संस्थेच्या 35 वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेण्यात आला. वीज पडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना संस्थेच्या वतीने मदतीची घोषणा करण्यात आली. ठेवीदार, नियमित कर्जदार, व्यवस्थापक व अभिकर्त्यांचा गौरवही पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला.
सभासद हाच पतसंस्थेचा आत्मा – अॅड देविदास काळे
सभासद हाच आपल्या पतसंस्थेचा खरा आधारस्तंभ आणि प्रेरणास्रोत आहे. त्यांच्या सहभाग, समर्पण आणि विश्वासाच्या जोरावरच संस्थेची प्रगती साध्य झाली आहे. गुंतवणूकदार, कर्जदार आणि अभिकर्त्यांच्या अटूट विश्वासामुळेच आज संस्थेचा वटवृक्ष एवढा भव्य आणि समृद्ध झाला आहे. सभासदांच्या प्रत्येक योगदानाने संस्थेची पाळेमुळे अधिक दृढ झाली असून, हा विश्वास अखंड टिकवून, संपूर्ण महाराष्ट्रात संस्थेची कीर्ती आणि कर्तृत्व बहरत राहावे, हा आमचा अटल संकल्प आहे.
आमदार संजय देरकर यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना नमूद केले की विश्वास, प्रामाणिकपणा आणि सहकार्य यांच्या जोरावर संस्था सहकार चळवळीत वेगळा ठसा उमटवत आहे. तसेच सुरेश इंगोले, सचिन कुडमेथे, अरुणाताई खंडाळकर, अरविंद ठाकरे व उदय रायपुरे यांनीही संस्थेच्या विश्वासार्हतेवर आपले विचार मांडले. मेळाव्याचे प्रास्ताविक सुरेश बरडे यांनी केले, सूत्रसंचालन अशोक कोरडे यांनी तर आभार प्रदर्शन विलास होलगीरवार यांनी केले.





Comments are closed.