खडकीत काँग्रेसचे शेतक-यांच्या प्रश्नांसाठी रास्ता रोको आंदोलन

तीन तास ठप्प वाहतूक; शेतक-यांना एकरी 50 हजारांची नुकसान भरपाईची मागणी

बहुगुणी डेस्क, वणी: अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतक-यांना एकरी 50 हजार रुपये द्या या मागणीसाठी खडकी (गणेशपूर) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुमारे 3 तास हे आंदोलन सुरु होते. आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. अखेर अधिका-यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. काँग्रेसच्या एसटी कर्मचारी सेलचे विभागीय अध्यक्ष व वसंत जिनिंगचे अध्यक्ष आशिष खुलसंगे यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आले. जर मागणी मान्य झाली नाही, तर यापेक्षा मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

आधी ऑगस्ट महिन्यात आणि नंतर सप्टेंबरमध्ये मुसळधार पावसाने झरी, मारेगाव आणि वणी तालुक्यासह संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान केले. दुबार-तिबार पेरणीमुळे आधीच शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली होती, त्यातच पावसामुळे आणखी फटका बसला. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मदत आणि कर्जमाफीची मागणी करत रास्ता रोको आंदोलन झाले. सकाळी 10.30 वाजता या आंदोलनाला सुरुवात झाली. आंदोलनात मोठ्या संख्येने झरी तालुक्यातील काँग्रेसचे मोठे नेते व कार्यकर्ते उपस्थित झाले होते. रास्ता रोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूला सुमारे 2 किलोमीटरची रांग लागली होती. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

“शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस आता कायम रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेणार आहे. आमची मागणी मान्य न झाल्यास यापेक्षा मोठे आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा आशिष खुलसेंग यांनी दिला. आंदोलनात राजीव कासावार, राहुल दांडेकर, नीलेश येल्टीवार यांच्यासह इतर नेत्यांनीही मनोगत व्यक्त करताना शासनाचा निषेध नोंदवला. अखेर 1.30 वाजताच्या सुमारास तहसिलदार, ठाणेदार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांनी ठोस आश्वासन दिल्यानंतर आंदोलकांद्वारे निवेदन देण्यात आले.

निवेदनावर शेखर बोनगीरवार, डॉ. मासिरकर, सुरेंद्र गेडाम, गणेश बोलेकार, प्रशांत बगेले, सचिन टाले, राजू उपरे, संतोष कोहळे, रवि ढेंगळे, श्रीकांत अनमुलवार, निखील चौधरी, चेतन मॅकलवार, सागर मुत्यलवार, दिवाकर पुसाम, अंकीत घडमे, साहील गीरजेवार, नारायण तोटावार, अनिल मॅनलवार, उपजा मॅनरवार, दत्ता परचाके यांच्यासह काँग्रेस कर्यकर्ते व समर्थकांच्या स्वाक्षरी आहेत. आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिलांचा देखील समावेश होता.

Comments are closed.