समाजातील विविध घटकांच्या संस्कारामुळे मी घडलो – गजानन कासावार यांचे प्रतिपादन

विद्यार्थ्यांना जीवनप्रवासातील अनुभवकथनातून दिली प्रेरणा

पुरुषोत्तम नवघरे, वणी : “एखाद्या व्यक्तीची जडणघडण एका घटकामुळे होत नाही. माझ्या आयुष्याच्या घडणीत आजी–आजोबा, आई–वडील, कुटुंब, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विदर्भ साहित्य संघ, माधवराव सरपटवार, स्व. अरुण राऊत, नरेंद्र इंगोले अशा अनेक व्यक्ती व संस्थांचा मोलाचा वाटा आहे,” असे प्रतिपादन अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य व उच्च श्रेणी मुख्याध्यापक गजानन कासावार यांनी केले.

ते नगर परिषद शाळा क्र. 8 येथे स्व. दिलीप कोरपेनवार यांनी सुरू केलेल्या ‘मी असा घडलो’ या उपक्रमाच्या तिसऱ्या पुष्पगुंफण कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होते. या कार्यक्रमाला शाळा स्थापन समितीच्या अध्यक्षा मनीषा शिवरकर अध्यक्षस्थानी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष कार्तिक रुईकर, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या चित्रा बावणे, मुख्याध्यापक देवेंद्र खरवडे, ज्येष्ठ शिक्षिका सुनीता जकाते उपस्थित होते.

कासावार यांनी प्राथमिक शाळेपासूनच्या आपल्या जीवनप्रवासातील अनुभव कथन करताना शालेय जीवनातील स्काऊट–गाईड संस्कार, डी.एड.मधील प्रशिक्षण, अध्यापन काळात मिळालेली प्रोत्साहनपर साथ, तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतील कार्याचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर झालेला परिणाम सांगितला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या कार्यक्रमात शाळेतील स्वच्छता कामगार पालकांचा शाल–श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच ‘राष्ट्रपिता ते राष्ट्रपुरुष’ पंधरवड्यात आयोजित चित्रकला व निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षिका सुनीता जकाते यांनी, सूत्रसंचालन अविनाश तुंबडे यांनी, तर आभार प्रदर्शन काकासाहेब जयभाये यांनी केले. यशस्वीतेसाठी किरण जगताप व नीलिमा राऊत यांनी परिश्रम घेतले.

Comments are closed.