वणीच्या दोन तरुणांचा मारेगावात जाऊन घरासमोर गोंधळ

ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल, अश्लिल व जातीवाचक शिविगाळ केल्याचा आरोप

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील दोन तरुणांनी मारेगाव येथे जाऊन एका घरासमोर गोंधळ घालत जातीवाचक शिविगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. शुक्रवारी दिनांक 3 ऑक्टोबर रोजी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, मारेगाव पोलिसांनी दोन्ही तरुणावर ऍट्रोसिटीसह विविध गुन्हे दाखल केले. 

फिर्यादी आकाश मनोहर भेले (वय 32) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आकाश हा रा. भिवाजी वार्ड क्र. 17, मारेगाव येथील रहिवासी आहे. शुक्रवारी दिनांक 3 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता तो त्याच्या लहान भावासह जेवणासाठी करणवाडी येथे होता. दरम्यान त्यांना वडिलांचा फोन आला. त्यांनी सांगितले की, घराच्या गेटजवळ श्रेयस चिट्टलवार (वय 23, रा. वणी) आणि आदित्य दास (वय 23, रा. वणी) हे गोंधळ घालत आहे. जर एका तासात आकाश आणि महेश घराबाहेर आले नाही. तर हातपाय तोडून जिवाने मारतो, अशी ते धमकी देत आहे. तसेच ते अश्लिल व जातीवाचक शिवीगाळ करत असल्याची माहिती दिली. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वडिलांच्या कॉलनंतर आकाश आणि त्यांचा लहान भाऊ महेश घरी परतले, मात्र तेव्हा दोन्हीही आरोपी तिथे उपस्थित नव्हते. त्यानंतर त्यांनी परिसरात शोध घेतला असता कोलगाव रोडवर एकाने आरोपी आदित्य दास हा वणीला गेल्याची माहिती दिली. आकाशने आदित्यला कॉल केला. आदित्यने पुन्हा एकदा आकाश यांना अश्लील आणि जातीवाचक अपशब्द वापरत धमकी दिली, असेही तक्रारीत नमूद आहे.

या गंभीर प्रकारानंतर आकाश भेले यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. मारेगाव पोलिसांनी आकाश भेले यांच्या फिर्यादीवरून श्रेयस चिट्टलवार आणि आदित्य दास या दोघांविरुद्ध बीएनएसच्या कलम 296, 3(5), 351(2) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3(1)(r), 3(1)(s), 3(2)(va), 6 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.

Comments are closed.