सहकार म्हणजे सामाजिक एकात्मतेचा उत्सव – जे. के. ठाकूर

भद्रावती येथे श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या सदस्य मेळावा दिमाखात

बहुगुणी डेस्क, वणी: सहकार म्हणजे केवळ आर्थिक व्यवहारांचे माध्यम नाही, तर तो सामाजिक एकात्मतेचा उत्सव आहे. असे प्रतिपादन जे. के. ठाकूर, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था चंद्रपूर यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 च्या औचित्याने श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या., वणी यांच्या वतीने रविवार, 12 ऑक्टोबर रोजी भद्रावती येथील स्वागत सेलिब्रेशन हॉलमध्ये भव्य सदस्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. सहकाराचे महत्त्व अधोरेखित करणे, संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेणे आणि सभासदांशी संवाद साधणे हा मेळाव्याचा मुख्य उद्देश होता, ज्याला सभासदांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मेळाव्याचे उद्घाटन जे. के. ठाकूर यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक निबंधक (प्रशासन) गणेश काळे, सहकार अधिकारी भवरकर, सुनील पांडे आणि सचिन गौरखेडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. देविदास काळे यांनी भूषविले.

प्रस्ताविकेत उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर यांनी संस्थेचा प्रवास, उद्दिष्टे आणि भविष्यातील योजना मांडल्या. यवतमाळ जिल्हा सहकारी बोर्डाचे तज्ञ संचालक प्रा. कवडू नगराळे यांनी ‘सहकारातून समृद्धी’ या विषयावर मार्गदर्शन करताना सहकार क्षेत्राचे सामर्थ्य आणि भविष्यातील दिशा स्पष्ट केली. संचालक परीक्षित एकरे यांनी मनोगत व्यक्त करत संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला आणि सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी पतसंस्थेच्या आगामी योजनांची माहितीही दिली. जे. के ठाकूर यांनी उद्घाटनपर मनोगत व्यक्त करीत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

सहकार हे सामाजिक एकात्मतेचे माध्यम – जे. के. ठाकूर
सहकार म्हणजे केवळ आर्थिक व्यवहारांचे माध्यम नाही, तर तो सामाजिक एकात्मतेचा आणि लोकशक्तीचा उत्सव आहे. जेव्हा सामान्य नागरिक सामूहिक ध्येयाने, विश्वासाने आणि पारदर्शकतेने एकत्र काम करतात, तेव्हा ते केवळ संस्थाच नव्हे तर संपूर्ण समाज समृद्ध होतो. ‘सहकारातून समृद्धी’ ही संकल्पना आपल्याला सांगते की, एकट्याने शक्य नसलेली प्रगती एकजुटीतून सहज शक्य होते.
— जे. के. ठाकूर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर 

अध्यक्षीय भाषणात अ‍ॅड. देविदास काळे यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आढावा घेत भविष्यातील विकासाचे ध्येय मांडले. सहकाराच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक प्रगतीसाठी संस्था सदैव कटिबद्ध राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मेळाव्यातील प्रमुख आकर्षण ठरला सत्कार सोहळा. पतसंस्थेच्या आर्थिक बळकटीसाठी योगदान देणाऱ्या ठेवीदार, कर्जदार, अभिकर्ते आणि शाखा व्यवस्थापकांचा विशेष सन्मान करण्यात आला. मान्यवरांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा करत संस्थेच्या प्रगतीत त्यांच्या भूमिकेचे कौतुक केले.

व्यासपीठावर परीक्षित एकरे, पुरुषोत्तम बद्दमवार, लिंगारेड्डी अंडेलवार, सुधीर दामले, हरिशंकर पांडे, रमेश भोगळे, सुरेश बरडे, अ‍ॅड. घनश्याम निखाडे, भुपाळराव पिंपळशेंडे, चिंतामण आगलावे, उदय रायपुरे, अरविंद ठाकरे, सुनिल देठे, छाया ठाकूरवार आणि निमा जीवने उपस्थित होते. विशेष उपस्थितांमध्ये चंद्रकांत गुंडावार, नीलेश गुंडावार, मोहम्मद जाकीर, सूरज गावंडे, सुशील देवगडे आणि सचिन खुटेमाटे यांचा समावेश होता.

मेळाव्याच्या यशस्वितेसाठी उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर यांच्यासह सर्व संचालक, अधिकारी आणि कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे नियोजन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दोरखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा व्यवस्थापक प्रज्ञा टोंगे, सर्व कर्मचारी व अभिकर्त्यांनी केले. सूत्रसंचालन सचिन ढोके यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुरेश बरडे यांनी केले.

Comments are closed.