वणीकरांच्या तक्रारींना मिळणार थेट प्रतिसाद — शिवसेनेतर्फे ‘जनता दरबार’

6 नोव्हेंबर रोजी आयोजन.... जनतेशी संवादाचा सेतू उभारणार - विजय चोरडिया

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या चार वर्षांपासून वणी नगर पालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये प्रशासकीय कारभार सुरू असल्याने शहरातील नागरिक विविध समस्यांनी ग्रासले गेले आहेत. अधिकारी वर्ग महत्त्वाची कामे करण्यास धजावत नाही, तर अनेकदा मनमानी कारभारामुळे सामान्य जनतेला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आता जनतेच्या थेट संवादासाठी ‘जनता दरबार’ आणि पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे. अशी माहिती शिवसेना नेते विजय चोरडिया यांनी दिली.

यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मा. संजय राठोड यांच्या संकल्पनेतून 6 नोव्हेंबर रोजी वणी येथे दुपारी 12 ते 2 दरम्यान ‘जनता दरबार’ पार पडणार आहे. त्यानंतर 3 ते 5 वाजेपर्यंत भव्य पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात नागरिकांना आपल्या समस्या थेट मांडता येणार असून, संबंधित विभागांकडून तत्काळ कार्यवाहीचे आश्वासनही देण्यात येणार आहे. दरम्यान भव्य पक्ष प्रवेश सोहळा देखील याच वेळी होणार आहे. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

जनतेशी संवादाचा सेतू उभारणार
प्रशासनाच्या निर्णयांवर अवलंबून राहून नागरिकांचे प्रश्न सुटत नाहीत. अनेक वेळा शासन आणि प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. नागरिकांच्या मूलभूत समस्या — पाणीपुरवठा, रस्ते, वीज, स्वच्छता, आणि स्थानिक सुविधा — यावर तातडीने तोडगा निघणे आवश्यक आहे. आमचा उद्देश प्रशासनाच्या गतीमानतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे नव्हे, तर लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी थेट संवादाचा सेतू उभारणे आहे.

वणीकर नागरिकांनी आपल्या समस्या शिवसेना जनसंपर्क कार्यालय, वणी विधानसभा (घर संसार सेल जवळ, जैन मंदिर समोर) येथे मांडाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. संपर्कासाठी राजु रिंगोले (92848 81655) आणि विक्की (99221 65885) यांच्याशी संपर्क साधावा लागणार आहे. 

Comments are closed.