बापलेकाची दुकानदाराला मारहाण, विट मारून केले जखमी

शुल्लक वाद गेला विकोपाला, गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: सावर्ला गावात किराणा दुकानात खरेदीसाठी आलेल्या दोन व्यक्तींमध्ये वाद विकोपाला जाऊन एका तरुण दुकानदारावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वणी पोलीस स्टेशनमध्ये मारहाण करणा-या बापलेकाविरोधात बीएनएसच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी कुणाल प्रविन केळझळकर (वय 18, रा. सावर्ला) यांनी दिलेल्या तक्रारीवरून, दिनांक 01 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते आपल्या किराणा दुकानात उपस्थित होते. यावेळी गावातील विशाल (वय 21) आणि त्याचे वडील श्रीराम (वय 55) हे दोघे दुकानात खर्रा घेण्यासाठी आले. दुकानातच दोघांमध्ये वाद सुरू झाल्याने कुणाल यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मात्र, समजावण्याच्या प्रयत्नात विशालने शिवीगाळ केली. दरम्यान त्याचे वडील श्रीराम यांनी दुकानासमोर पडलेली विट उचलून कुणालच्या डोक्यावर मारली. त्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली आणि तो खाली बसला. यावेळी उपस्थित पंकज रमेश आवारी आणि महादेव भाऊराव तुराणकर यांनी मध्यस्थी करत कुणालला सोडवले. त्यांनाही विशालने जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर कुणाल केळझळकर यांनी वणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून, आरोपी विशाल आणि त्याचे वडील श्रीराम यांच्याविरोधात बीएनएसच्या कलम 118(1), 351(2), 351(3), 352 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Comments are closed.