पाणीकर घेताय, पण पाणी नाही — कॅनचा धंदा फोफावल्याचा आरोप
मनसे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांनी उपस्थित अनियमीत व अशुद्ध पाण्याचा मुद्दा
बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरात सातत्याने नागरिकांना अनियमित आणि अशुद्ध पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत आहे. शहरात कधी चार तर कधी पाच दिवसांनी नळाला पाणी येत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून गोरगरीबांना पिण्याचे पाण्यासाठी कॅन खरेदी करावी लागत आहे. याचा त्यांच्यावर आर्थिक भार पडत आहे. “पाणीकर भरतोय मग कॅन का घ्यावी लागते?” असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वणी शहर शाखेने नगरपरिषद प्रशासनाला धारेवर धरले आहे. शहरातील नागरिक दरवर्षी पाणीकर भरत असतानाही शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा न होणे हे प्रशासनाचे अपयश आहे. असा आरोप मनसेचे शहराध्यक्ष अंकुश चिं. बोढे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पालिकेला निवेदन सादर केले आहे.
पावसाळ्यातही वणीकर पाणीटंचाईच्या विळख्यात सापडले होते. नदीला मुबलक पाणी असतानाही टंचाई जाणवत असल्याने नागरिकांत नाराजी आहे. संपूर्ण वर्षभर वणीत अशुद्ध पाणीपुरवठा होतो. या परिस्थितीमुळे शहरात “कॅन माफिया” सक्रिय झाल्याची चर्चा असून, “पालिकेचा हा त्यांना पोषक कारभार नाही ना?” असा सवाल बोढे यांनी उपस्थित केला आहे. पूर्वीही नागरिकांनी व मनसेने पालिकेकडे या समस्येबाबत तक्रार केली होती, मात्र अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही.
या निवेदनावेळी उपशहराध्यक्ष कृष्ण निमसटकार, शहर सचिव शंकर पिंपळकर, तसेच सूरज पळसकर, आशिष चतुर, अहेमद रंगरेज, स्वयम ठाकरे, प्रवीण बोथरा, सुजल तिवारी, नवीन पिंपळकर, प्रज्योत टांगे आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते. अंकुश बोढे हे गेल्या काही महिन्यांपासून शहरातील विविध प्रभागांमध्ये जाऊन स्थानिक समस्या जाणून घेत आहेत. त्यावर उपाययोजना व्हावी म्हणून पालिकेकडे निवेदन देत सतत पाठपुरावा करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे शहरातील अनेक स्थानिक समस्या मार्गी लागल्याची माहिती मनसे कार्यकर्त्यांनी दिली.
आहे.
प्रभाग क्र. 4 मधून होतकरू तरुण दिगांबर उर्फ वसंत गायकवाड सज्ज !





Comments are closed.