आरोग्य विभागाला रिक्त पदाचा आजार

0

सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील आरोग्य विभागाला गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त पदाचा आजार जडला आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना योग्य ती आरोग्य सेवा मिळत नसल्याची ओरड सुरू आहे. आजच्या परिस्थितीत आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ११९ पदापैकी ३८ पदे रिक्त आहे. त्यामुळे सध्या रुग्णांवर ‘रेफर’च्या सलाईनवर जगण्याची वेळ आली आहे.

झरी या आदिवासीबहुल तालुक्यातील जनतेच्या आरोग्यासाठी मुकुटबन, शिबला आणि झरी या तीन ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सेवा दिली जाते. झरी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत मार्की, झरी, जामनी, जुणोनी, झमकोला, माथार्जुन आणि मांडवी हे सात उपकेंद्र येतात. मुकुटबन प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत मुकुटबन, अडेगाव, दुर्भा, लिंगटी, बोपापूर, खातेरा, पांढरकवडा (लहान), खडकी आणि मांगली हे नऊ उपकेंद्र येतात. तर शिबला प्राथमिक आरोग्य केंद्रात शिबला, हिवरा बारसा, सुसरी ,आणि चिखलडोह हे चार उपकेंद्र कार्यरत आहेत. अशा २० उपकेंद्रांतर्गत जनतेला आरोग्य सेवा दिली जाते. मात्र यात मागील तीन ते चार वर्षांपासून रिक्त पदे भरले नसल्याने तालुक्यातील आरोग्यसेवा उपचारविना कोलमडली आहे.

तालुक्याचा आरोग्याचा कारभार सांभाळणाऱ्या मुकुटबन, शिबला आणि झरी या प्राथमिक आरोग्य केंद्रात बहुतांश पदे रिक्त आहेत. यात वैदकीय अधिकारी (वर्ग २), वैदकीय अधिकारी (वर्ग 3 ), औषधी निर्माता, आरोग्य सहाय्यक (पुरुष), आरोग्य सहाय्यक (महिला), आरोग्य सहाय्यक महिला कनिष्ठ, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), प्रयोग शाळा तंत्रज्ञ ,कुष्ठरोग तंत्रज्ञ, कनिष्ठ सहायक, वाहनचालक (कंत्राटी), परिचर (पुरुष), परिचर (महिला), सफाई कामगार आणि अंशकालीन स्त्री परिचर अशी पदे रिक्त आहेत.

मुकुटबन आरोग्य केंद्रातील ४९ मंजूर पदापैकी केवळ १५ भरलेली असून ३३ पदे अजूनही रिक्त आहेत. तर झरी आरोग्य केंद्रातील ४० मंजूर पदापैकी २९ पदे भरलेली असून ११ रिक्त आहेत. तर शिबला आरोग्य केंद्राअंतर्गत ३० मंजूर पदापैकी १८ भरली असून १२ पदे रिक्त असल्याचा दुजोरा आरोग्य विभागाकडून मिळत आहेत.

झरीजामनी तालुक्यातील मुकुटबन, शिबला आणि झरी या तीन केंद्रांदरम्यान अधिकारी व कर्मच्याऱ्यांच्या ११९ पदापैकी केवळ ८० पदावर अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून ३८ पदे मागील तीन ते चार वर्षांपासून रिक्त आहेत. तालुक्याच्या आरोग्य विभागात रिक्त असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचा-यांवर अतिरिक्त भार पडत आहेत. अशा रिक्त पदाच्या आजाराने तालुक्यातील आरोग्य विभागाला मागील काही वर्षांपासून रेफरची बिमारी लागली आहेत. तालुक्यात रिक्त असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदाची जिल्हा आरोग्य विभागाने दखल घेऊन त्वरीत पद भरती करून रुग्णांची हेळसांड थांबवावी अशी मागणी होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.