मनसेच्या आंदोलनानंतर बोर्डा-गोधणी रस्त्याच्या कामाला सुरुवात

मनसेचे लक्ष्मण उपरे यांच्या नेतृत्त्वात बोर्डा येथे आंदोलन

बहुगुणी डेस्क, वणी: गोधणी–बोर्डा या मार्गावरील गोधणी ते बोर्डा दरम्यानचे रस्त्याचे काम अर्धवट थांबलेले होते. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेत आज शुक्रवारी दिनांक 7 नोव्हेंबर रोजी बोर्डा येथे आंदोलन केले. अखेर बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांना तात्काळ काम सुरु करण्याचे आश्वासन देत कामाला सुरुवात केली. मनसेचे पंचायत समिती घोन्साचे विभागाध्यक्ष लक्ष्मण उपरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला गावक-यांनीही साथ दिली. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकातून मनसेने दिली. 

बोर्डा ते गोधणी या रस्त्याचे बांधकाम काम पूर्ण करण्यासाठी 300 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र दीड वर्ष उलटूनही काम पूर्ण झाले नाही. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. विशेषतः दुचाकीस्वार आणि शालेय विद्यार्थ्यांना दररोज या खड्ड्यांतून मार्ग काढताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते.

दिनांक 1 नोव्हेंबर रोजी मनसेने सार्वजनिक बांधकाम विभाग, मारेगाव येथे निवेदन देऊन तातडीने काम सुरु करण्याची मागणी केली होती. परंतु प्रतिसाद न मिळाल्याने आज कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. आंदोलना दरम्यान सुमारे दुपारी 1 वाजताच्या सुमारास बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आणि काम तातडीने सुरु करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तात्काळ कामाला सुरुवात करण्यात आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या आंदोलनात लक्ष्मण उपरे, प्रवीण दुमोरे, प्रतिक पानघाटे, निखिल आस्वले, ईश्वर पायघन, हरीश दुधबळे, सुरेश दुधबळे, आनंदराव पानघाटे, अंकुश मिलमिले, राहुल काकडे, नामदेव काकडे यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनसेच्या चेतावणीनंतर कामाला प्रारंभ झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, काम पूर्ण होईपर्यंत देखरेख सुरू ठेवणार असल्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Comments are closed.