जनतेच्या प्रश्नांसाठी अनुभवी योद्धा सज्ज – भारत कुंभारे उतरणार रिंगणात
जुन्या वस्तीत घरपट्टा, नव्या वस्तीतील मुलभूत समस्या – दोन्ही आघाड्यांवर काम करणार
बहुगुणी डेस्क, वणी: वणी नगर परिषद निवडणुकीच्या रणशिंगात प्रभाग क्रमांक 9 मध्ये जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारा एक अनुभवी योद्धा पुढे आला आहे. बहुजनवादी, आंबेडकरवादी चळवळीतील सक्रीय कार्यकर्ता, सामाजिक संघटनांतून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे त्यांना न्याय मिळवून देण्यात कायम प्रयत्नशील असणारे भारत शंकर कुंभारे आता लोकप्रतिनिधी म्हणून निवडणुकीच्या मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहेत. “जनतेचा हक्काचा आवाज” बनण्याच्या निर्धाराने त्यांनी जुन्या वस्तीत घरपट्ट्याचा प्रश्न आणि नव्या वस्तीतील मुलभूत समस्यांच्या डोंगराला भिडण्याची तयारी दाखवली आहे. नवीन आणि जुनी वस्ती दोन्ही आघाड्यांवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी रणशिंग फुंकले आहे.
भारत कुंभारे यांचा थोडक्यात परिचय
भारत शंकर कुंभारे हे वणीतील प्रभाग क्रमांक 9 मधील रहिवासी असून त्यांचे वय 52 आहे. ते उच्च शिक्षित आहेत. त्यांनी B.A. पदवी प्राप्त केली असून LLB अंतिम वर्षात ते शिक्षण घेत आहेत. भारत कुमरे या नावाने ते वणीत व परिसरात ओळखले जात असले तरी त्यांचे कागदोपत्री नाव भारत कुंभारे आहे. व्यवसाय म्हणून ते शेती आणि प्रॉपर्टी क्षेत्रात कार्यरत आहेत. बहुजनवादी, आंबेडकरवादी चळवळीतील एक प्रमुख चेहरा म्हणून ते ओळखले जातात. ते अनेक वर्ष आंबेडकरी चळवळीशी जुळलेल्या पक्षात कार्यरत आहेत. त्या माध्यमातून विविध आंदोलनांत, सामाजिक कार्यात ते सक्रीय आहेत. जनतेच्या प्रश्नांना आवाज उठवणारे कुंभारे यांनी आता नगर परिषदेच्या माध्यमातून गोरगरीबांच्या समस्यां सोडवण्याचा निर्धार केला आहे.
घरपट्टा आणि मूलभूत सुविधांचा मुद्दा अग्रक्रमावर
प्रभाग क्रमांक 9 हा जुनी वस्ती आणि नवीन वस्ती अशा दोन भागात विभागला आहे. जुन्या वस्तीत घरपट्टा ही सर्वात मोठी समस्या आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून गोरगरीबांसाठी लढा देत घरपट्ट्याचा प्रश्न सोडवणार, असे रणशिंग त्यांनी फुंकले आहे. यासह नवीन वस्ती नुकत्याच नगरपालिकेत समाविष्ट झालेल्या वस्ती मुलभूत समस्यांपासून वंचित आहे. येथे रस्ते, नळ सुविधा आणि अंडरग्राऊंड नाली यांसारख्या समस्यांचा डोंगर आहे. या प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे हेच माझे ध्येय आहे, असे भारत कुंभारे सांगतात.
प्रत्येकाला अभिमान वाटणारे राजकारण करणार
माझं राजकारण हे केवळ निवडणुकीपुरतं नाही, तर जनतेच्या प्रत्येक समस्येचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आहे. जुन्या वस्तीत घरपट्टा आणि नव्या वस्तीत रस्ते, नळ व नाल्यांच्या समस्या—या दोन्ही आघाड्यांवर मी कायमस्वरूपी उपाययोजना करणार आहे. नगर परिषद ही गोरगरीबांसाठी न्याय मिळवून देणारी संस्था बनावी, हा माझा संकल्प आहे. सामाजिक न्याय, समानता आणि विकासाच्या माध्यमातून प्रत्येक वर्गाला जोडून वणी शहर अधिक समृद्ध आणि सर्वसमावेशक बनवणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून मी जनतेच्या प्रत्येक समस्येचा भागीदार होऊन पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनाची हमी देईन—ज्यामुळे प्रभागातील प्रत्येक कुटुंबाला अभिमान वाटेल. – भारत कुंभारे, सामाजिक कार्यकर्ते

प्रभाग क्रमांक 9 मध्ये पंचशील नगर (यशोदा फेल), साई नगरी, मोमिनपुराचा काही भाग, साने गुरुजी नगर, भोंगळे लेआऊट, फाले लेआऊट, प्रगती नगरचा काही भाग, जैन लेआऊटचा काही भाग यासह हिराणी लेआऊट, पद्मावती नगर, पोटदुखे लेआऊट, आनंद नगर सोसायटी या नवीन भागाचा समावेश होतो.
भारत कुंभारे यांची उमेदवारी ही केवळ निवडणुकीतील एक पर्याय नसून, ती प्रभागाच्या नव्या भविष्याची सुरुवात ठरू शकते. सध्या त्यांनी पक्षाकडे तिकीटासाठी अर्ज केला आहे. जर त्यांना पक्षातर्फे तिकीट न मिळाल्यास अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा मानस त्यांनी वणी बहुगुणीजवळ व्यक्त केला आहे.



Comments are closed.