14 कुटुंबांचा शेतमाल अडकला; रस्त्याच्या मागणीसाठी उपोषण
वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात देवाळा शेतकऱ्यांचे आंदोलन
बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील देवाळा येथील शेतकऱ्यांनी शेतमाल वाहतुकीचा रस्ता मोकळा करून देण्याच्या मागणीसाठी सोमवार, 10 नोव्हेंबरपासून मारेगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणास सुरुवात केली आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, रस्ता अडथळ्यामुळे तब्बल 14 कुटुंबांचा सोयाबीन व कापूस शेतातच पडून आहे. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत असून उपासमारीची वेळ आली आहे. शेतकरी बापूजी अमृत देवाळकर व संजय अमृत देवाळकर यांच्यासह संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र भूमिका घेतली आहे.
शेतकऱ्यांनी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 143 आणि मामलेदार कोर्ट ॲक्ट 1906 चे कलम 5 यांचा दाखला देत रस्त्याचा कायदेशीर हक्क अधोरेखित केला आहे. यासाठी त्यांनी 15 ऑक्टोबर रोजी तहसीलदारांकडे अर्ज दाखल केला होता. नायब तहसीलदार व मंडल अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून रस्ता अडविल्याचे स्पष्ट केले होते. तरीही प्रशासनाने कार्यवाही न केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर करीत असून, “जोपर्यंत शेतकऱ्यांना त्यांचा कायदेशीर हक्क मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू राहील. उपोषणादरम्यान काही विपरीत घडल्यास प्रशासन जबाबदार असेल,” असा इशारा त्यांनी दिला आहे.



Comments are closed.