भाजपच्या रॅलीने वेधले वणीकरांचे लक्ष, विद्या आत्राम नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार
यंदा पुन्हा पालिकेवर कमळ फुलणार - मा. आ. संजीवरेड्डी बोदुकरवार
बहुगुणी डेस्क, वणी: नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारचा दिवस भाजपसाठी महत्त्त्त्वाचा ठरला. रविवारी भाजप उमेदवारांनी वाजत गाजत रॅली काढून नामनिर्देशन अर्ज सादर केले. या रॅलीने वणीकरांचे लक्ष वेधले विद्या खेमराज आत्राम यांनी नगराध्यक्ष पदासाठी भाजपतर्फे फॉर्म भरला. तर रविवारी भाजपतर्फे तिकीट कापल्या गेलेल्या अनेकांनी प्रवेश बदलवत इतर पक्षात प्रवेश केला. आज सोमवारी नामनिर्देशन सादर करण्याची अंतिम तारीख आहे.
भाजपच्या रॅलीने वेधले वणीकरांचे लक्ष
रविवारी सकाळी 10.30 वाजता जत्रा मैदानाजवळील रंगनाथ स्वामी मंदिरातून रॅलीला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करीत तहसिल कार्यालयात या रॅलीची सांगता झाली. या रॅलीत भाजपचे उमेदवार, कार्यकर्ते व भाजपचे स्थानिक नेते यांची उपस्थिती होती. संत श्री जगन्नाथ महाराज देवस्थान येथे माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी भेट देत उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. वाजत गाजत निघालेल्या या रॅलीत हजारो नागरिकांचा सहभाग होता. रॅलीने वणीकरांचे लक्ष वेधले.
यंदा पुन्हा पालिकेवर कमळ फुलणार
वणीकरांचा विश्वास हा आमचा सर्वात मोठा आधार आहे. आजच्या या रॅलीत नागरिकांनी दाखवलेला उत्साह आणि सहभाग पाहून मला खात्री पटली आहे की नगरपालिकेत पुन्हा कमळ फुलणार आहे. भाजपने नेहमीच विकासाला प्राधान्य दिले आहे—शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण, आरोग्य यांसारख्या मूलभूत गरजांवर आम्ही काम केले आहे आणि पुढेही तेच काम अधिक जोमाने करणार आहोत. – संजीवरेड्डी बोदकुरवार, नेते भाजप व माजी आमदार

यावेळी शहराध्यक्ष ऍड नीलेश चौधरी, माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, विजय पिदूरकर, दिनकर पावडे, गजानन विधाते, रवि बेलूरकर, संजय पिंपळशेंडे, कुणाल चोरडिया इत्यादींची विशेष उपस्थिती होती. यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी, बुथ प्रमुख व भाजपच्या विविध सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.



Comments are closed.