वणी येथे मतदार जागृतीसाठी पालिकेतर्फे बाईक रॅली
150 मोटारसायकलींसह मतदार जागृतीची धडाकेबाज रॅली
पुरुषोत्तम नवघरे, वणी: आगामी 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी उत्साहाने मतदान करावे, यासाठी वणी नगर परिषदेच्या वतीने मतदार जागृती बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली शहरातील 14 प्रभागातून काढण्यात आली. शासकीय मैदानावरून 150 मोटारसायकलींसह रॅलीला उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवी, पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे, गट विकास अधिकारी किशोर गज्जलवार आदी मान्यवर उपस्थित होते.

रॅली प्रभाग क्रमांक 1 पासून सुरू होऊन शहरातील सर्व प्रभागातून फिरली. नागरिकांना मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी घोषणाबाजी करत जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्याधिकारी डॉ. सचिन गाडे यांनी रॅलीचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले यांनी मार्गदर्शन करत प्रत्येक मतदाराने मतदान करणे ही लोकशाहीची जबाबदारी असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्याधिकारी जयंत सोनटक्के यांनी केले. रॅलीचा समारोप पाण्याच्या टाकीजवळील शासकीय मैदानावर झाला.


Comments are closed.