गोकुळ नगर परिसरात ऑटोचालकाची राहत्या घरी आत्महत्या
सकाळी घटना उघडकीस; कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
पुरुषोत्तम नवघरे, वणी: गोकुळ नगर परिसरातील जंगलीपीर दजवळ राहणाऱ्या एका इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवार 10 डिसेंबर रोजी सकाळी 6 ते 6.30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. गळफास घेतलेल्या इसमाचे नाव शकील सत्तार शेख (वय अंदाजे 50 वर्षे) असे आहे.
गोकुळ नगर परिसरात परिवारासह राहणारा शकील शेख हा ऑटो चालक होता. त्याला दोन मुली व एक मुलगा असून दोन्ही मुलींचे लग्न झाले आहे. मुलगा भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. पती–पत्नी व मुलगा असे तिघेच जण घरी राहायचे. घटना घडली तेव्हा पत्नी बाहेरगावी गेली होती, तर मुलगा भाजी खरेदीसाठी बाजारात गेला होता. घरात कुणी नसल्याची संधी साधून शकीलने राहत्या घरी गळफास घेतला.
त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील प्रमुख व्यक्तीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंब हादरले आहे.
शकील गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास पोलिस करीत आहेत.



Comments are closed.