विवेक तोटेवार, वणी: राज्यात गुटखा विक्रीवर कडक बंदी असतानाही वणी शहरासह संपूर्ण तालुक्यात दिवसाढवळ्या गुटख्याची खुलेआम विक्री सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या गंभीर व आरोग्याला घातक प्रकाराकडे पोलीस प्रशासन व अन्न-औषध प्रशासनाचे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आता नागरिकांकडून जोर धरू लागला आहे. वणी शहरातील विविध भागांतील पानटपऱ्या, किराणा दुकाने तसेच ग्रामीण परिसरातही गुटखा, सुगंधी पानमसाला व प्रतिबंधित तंबाखू सहज उपलब्ध आहे. कधीकधी पोलिसांकडून कारवाई झाल्याचे दाखवले जाते; मात्र त्या केवळ दिखाऊ ठरत असून गुटख्याची चोरटी वाहतूक व तस्करी आजही जोमात सुरू असल्याचे स्पष्ट दिसून येते.
या अवैध व्यवसायामागे ‘दीपक’ नावाचा मुख्य तस्कर कार्यरत असल्याची शहरात जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे त्याच्यावर अद्याप कोणतीही ठोस व निर्णायक कारवाई झालेली नसल्याने पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय अधिक गडद झाला आहे. गुटख्यावर कारवाईची थेट जबाबदारी अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांची असतानाही वणी शहर व तालुक्यात गुटख्याची विक्री, साठवणूक, तस्करी व उत्पादन सर्रास सुरू आहे. मध्यंतरी पोलिस व अन्न-औषध विभागाने संयुक्त कारवाया केल्याचे सांगितले जाते; मात्र त्या काही दिवसांपुरत्याच मर्यादित राहिल्या का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
दररोज चंद्रपूर जिल्ह्यातून कोट्यवधी रुपयांचा गुटखा वणीत आणला जात असल्याची माहिती आहे. मोठ्या ट्रकमधून गुटखा शहरात आणला जातो आणि नंतर छोट्या वाहनांद्वारे शहर व ग्रामीण भागात त्याचे वितरण केले जाते. या संपूर्ण तस्करी साखळीत जुन्या बस स्टँड परिसरातील एका प्रमुख गुटखा व्यापाऱ्याचा सक्रिय सहभाग असल्याचे बोलले जाते. त्यांच्या हालचालींची संपूर्ण माहिती पोलिसांकडे असूनही कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रतिबंधित ‘मजा’ तंबाखूचा काळाबाजार उघड
प्रतिबंधित ‘मजा’ तंबाखूचा काळाबाजार नियोजनबद्ध पद्धतीने चालवला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 200 ग्रॅमच्या डब्यावर एक महिन्याची एक्सपायरी असते. एक्सपायरीला 15 दिवस शिल्लक असताना रिकामा डबा 70 ते 80 रुपयांना विकला जातो, तर एक्सपायरीला 3 ते 5 दिवस उरले असताना तोच डबा 10 ते 20 रुपयांत विकला जातो.
कर्करोगास कारणीभूत ठरणारा हा प्रतिबंधित तंबाखू विकणाऱ्या दीपकने शहरात पंटर नेमले असून ते रिकामे डबे गोळा करतात व त्याबदल्यात त्यांना कमिशन दिले जाते. टिनाचे डबे वरून न फोडता खालून फोडले जातात आणि त्यात डुप्लिकेट प्रतिबंधित तंबाखू भरून पुन्हा पॅकिंग केली जाते. ही पॅकिंग मशीन वणी परिसरातच असल्याची माहिती असून हा बनावट तंबाखू शहरासह आजूबाजूच्या गावांमध्ये विकला जात आहे.



Comments are closed.