बेलोरा येथे ग्रामजयंती उत्सव उत्साहात
गिरीश कुबडे, बेलोरा: वणी नजिकच्या बेलोरा येथे ग्रामजंयती उत्सवाला थाटात आरंभ झाला. अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ मोझरी संलग्नित श्री गुरुदेव सेवा मंडळ व तंटामुक्त, दारूमुक्त बेलोरा ग्रामवासीयांनी या उत्सवाचे आयोजन केले. येथील हनुमान मंदिर परिसरात चाललेल्या उत्सवाचे उद्घाटन दिग्रस येथील प्रचारक राजदादा घुमनर यांनी मूल येथील प्रचारक चेतनदादा कवाडकर यांच्या अध्यक्षतेखाली केले. यावेळी बेलोऱ्याचे उत्सवाचे स्वागताध्यक्ष सरपंच प्रकाश खुटेमाटे, प्रमुख अतिथी कवी व निवेदक सुनील इंदुवामन ठाकरे, ग्रामगीताचार्य विद्या जुनगरी, कीर्तनकार गुणवंत पचारे, प्रचारक रामकृष्ण ताजणे, उपसरपंच आरतिका राखुंडे, पोलिस पाटील ललिता भोंगळे, बंडूजी गोवारदिपे विचारपीठावर उपस्थित होते.
प्रमुख अतिथी कवी सुनील इंदुवामन ठाकरे यांनी राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेतून दिलेला मानवतावाद मांडला. कर्मकांड व नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या ग्रामवासियांना राष्ट्रसंतांचे विचार किती प्रेरणादायी ठरू शकतात ते सांगितले. संत तुकाराम व कबिरांनी कसे अनिष्ट कर्मकांडांवर ताशेरे ओढलेत ते त्यांच्या काव्यांतून पटवून दिले. उद्घाटक राजदादा घुमनर यांनी देशात समता नांदविण्यासाठी सामुदायिक प्रार्थनेचा आग्रह धरला. ग्रामगीता हा ऊत्तम जीवन कसं जगावं याचा आदर्श असल्याचे ते म्हणाले. ग्रामगीता कळली की ग्रामीण जीवनदेखील उन्नत करता येतं असं ते यावेळी म्हणाले. ग्रामगीताचार्य विद्या जुनगरी यांनी अंधश्रद्धा व थोतांडांवर मात करीत ग्रामीण जनतेने प्रगती करण्याचे आवाहन केले.
ग्रामीण समाजव्यवस्था बळकट करण्यासाठी ग्रामगीता हा मुख्य आधार असल्याचंही त्या म्हणाल्या. कीर्तनकार गुणवंत पचारे यांनी ग्रामगीतेतील विविध अध्यांवर चर्चा केली. आदर्ष समाज उभारणीचे सूत्र ग्रामगीतेत कसे मांडले आहे, ते त्यांनी सांगितले. आपल्या अध्यक्षीय भाषणात आजच्या परिस्थितीवर भाष्य केले. समाजातील विषमता दूर झाल्यास राष्ट्र प्रगती करेल असे ते म्हणाले. ग्रामगीता ही सर्वसामान्य जनतेची मार्गदर्शिका आहे. जीवनातील प्रत्येक ठिकाणी ती आपल्याला कामात येते असेही ते म्हणाले. गावातील कर्तबगार व्यक्तींचा व त्यांच्या कार्याचा गौरव व्हायला हवा. ग्रामगीता ही आचरणात व प्रत्यक्ष कृतीत यायला हवी. यावेळी दोन गटांमध्ये वक्तृत्त्व स्पर्धा व रांगोळी स्पर्धा झाली.
कार्यक्रमाची प्रस्तावना गोपाल शिरपूरकर यांनी केले. भूमिका राजेंद्र घोटकर यांनी मांडली. संचालन हर्षाली बंडू जेऊरकर हिने तर आभारप्रदर्शन टीना योगेश्वर भोंगळे हिने केले. या उद्घाटन सोहळ्यानंतर राष्ट्रीय भजनाचा कार्यक्रम अनसूया माता बाल भजन मंडळ शेणगाव, शारदा महिला भजन मंडळ, गुरुदेव सेवा भजनमंडळ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भजन मंडळ सादर केला. आजीवन प्रचारक प्रेमलालजी पारधी यांच्या मार्गदर्शनात सामुदायिक प्रार्थना झाली. या कार्यक्रमाला बेलोरासह पंचक्रोषीतील नागरिक उपस्थित होते. आयोजनासाठी उत्सव समितीचे अध्यक्ष गजानन वरपटकर, उपाध्यक्ष किशोर सूर, रविंद्र बावणे व संपूर्ण चमूचे सहकार्य लाभले.