बहुगुणी डेस्क, वणी: रात्रीच्या अंधारात वणी–वरोरा मार्गावर मृत्यू दबा धरून बसला होता. मागून आलेल्या भरधाव कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. या जोरदार धडकेत तरुण दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. संतकुमार गोवर्धन जंघेल (वय 29), रा. मांजरी, जि. चंद्रपूर असे मृत तरुणाचे नाव आहे. महालक्ष्मी मॅरेज हॉलजवळ हा अपघात झाला. या अपघाताने पुन्हा एकदा सुसाट कोळसा वाहतुकीचे भयावह वास्तव समोर आणले आहे.
मृत संतकुमार जंघेल हा माजरी येथे वास्तव्यास होता. तो एका खासगी कंपनीत काम करत होता. गुरुवारी तो कामानिमित्त वणी येथे आला होता. आपले काम आटोपून तो दुचाकीने माजरीकडे परतत असताना वणी–वरोरा मार्गावरील महालक्ष्मी मॅरेज हॉलजवळ त्याच्यावर काळाने घाला घातला.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, मागून भरधाव वेगात येणाऱ्या कोळसा वाहतुकीच्या ट्रकने (MH 40 CT 4058) दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की संतकुमार याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. अपघातास कारणीभूत ठरलेला ट्रक हा एका ट्रान्सपोर्ट कंपनीचा असल्याची माहिती असून, ट्रक चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालविल्यामुळेच हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रक ताब्यात घेतला असून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, वणी–वरोरा मार्गावर कोळसा वाहतुकीची वाहने मोठ्या प्रमाणावर सुसाट धावत असल्याने अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कोळसा वाहतुकीवर कठोर नियंत्रण ठेवावे, वेगमर्यादा सक्तीने लागू करावी व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.





Comments are closed.