बहुगुणी डेस्क, वणी: “माझ्या नादाला लागलीस तर मारल्याशिवाय सोडणार नाही” – अशी धमकी देऊन पतीने वेगळी राहत असलेल्या पत्नीला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या मारहाणीत महिलेचा डावा हात फ्रॅक्चर झाला असून, तिला गंभीर दुखापत झाली आहे. लालपुलिया येथे गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, फिर्यादी किरण भोला नखाते (वय 40, रा. राजुर कॉलरी, ता. वणी) या मजुरी करतात. त्यांचे तीन वर्षांपूर्वी कृष्णा बजरंग दहे (वय 36, रा. लालपुलीया, वणी) यांच्याशी शिरपूर येथील मंदिरात ईश्वराला साक्षी ठेवून लग्न झाले. या लग्नानंतर त्या आधीच्या पतीला सोडून कृष्णा सोबत राहू लागल्या. मात्र काही दिवसांनी कृष्णा हा सतत किरणला मारहाण करीत होता. त्यामुळे किरण त्याच्यापासून वेगळ्या राहत होत्या. तीन महिन्याआधीही कृष्णाने किरणला मारहाण केली होती. याबाबत तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
गुरुवारी दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी कृष्णा किरणच्या घरी आला. “आता तुझ्यासोबत राहायचे नाही, मी दुसरी बायको करतो” असे म्हणत त्याने किरणचा मोबाईल फोडला आणि तिला जीवे मारण्याची धमकी दिली. कृष्णाची मावशी लालपुलिया परिसरात राहते. संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास किरण ही झालेला प्रकार सांगण्यासाठी कृष्णाच्या मावशीकडे लालपुलिया येथे गेली. तेथे कृष्णा आला आणि “तू माझ्या घरी का आलीस?” म्हणत लोखंडी रॉडने डोक्यावर आणि डाव्या हातावर बेदम मारहाण केली.
या हल्ल्यात किरणच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले. तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी किरणने वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर बयाण दिले. त्यांच्या बयाणावरून आरोपी कृष्णा बजरंग दहे यांच्यावर बीएनएसच्या कलम 118(2), 351(2), 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.





Comments are closed.