खळबळजनक – वणीतील एका पक्षाच्या नेत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

बार चालकाला दरमहा 25 हजारांचा हप्ता सुरु करण्यासाठी धमकी

बहुगुणी डेस्क, वणी: एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचे सांगत बार ऍन्ड रेस्टॉरन्ट चालकाला खंडणी मागितल्याच्या प्रकारामुळे वणी शहरात एकच खळबळ उडाली आहे. पाटाळा पुलाजवळील वेदा बार अँड रेस्टॉरंटमध्ये रविवारी रात्री ही घटना घडली. बार मॅनेजरला दरमहा 25 हजार रुपयांचा हप्ता सुरु करण्यासाठी धमकी दिली. या प्रकरणी आरोपी मोबीन शेख विरोधात खंडणीच्या गुन्ह्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, वणी शहरापासून काही अंतरावर वरोरा रोडवर पाटाळ्याच्या पुलाआधी वेदा हे रेस्टॉरन्ट व बार आहे. फिर्यादी शंकर चंद्रीका साव (वय 33, रा. कुचना, ता. वणी) हे वेदा बारचे मॅनेजर आहेत. रविवारी दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास ते नेहमी प्रमाणे हॉटेलमध्ये होते. दरम्यान तिथे आरोपी मोबीन शेख (वय अंदाजे 25, रा. एकता नगर, वणी) बारमध्ये आला. दारू पिल्यानंतर बिल मागितले असता त्याने बिल देण्यास नकार दिला. 

मॅनेजरने याबाबत विचारणा केली असता मोबीनने तो प्रहार पक्षाचा वणी तालुका अध्यक्ष आहे असे सांगितले. तसेच तुझ्या मालकाला कॉल करून निरोप दे. बार रात्री उशिरा पर्यंत सुरु राहतो. त्यामुळे दरमहा  25 हजार रुपयांचा हप्ता सुरु करायला मालकास सांग, असे म्हणत मॅनेजरला शिवीगाळ करत मारहाणीची धमकी दिली, असे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी या वेळी बारमधील इतर कर्मचारी विलास भोयर आणि श्रीकांत पाथरटकर हे उपस्थित होते.

मॅनेजरने याची माहिती मालक अभीजीत उर्फ अखिल सातोकर यांना फोनद्वारे दिली. मालकाने याबाबत पोलीस तक्रार करण्याची सूचना मॅनेजरला केली. मॅनेजरने वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी मोबीन शेख यांच्यावर बीएनएसच्या कलम 308(2) , 351(2) आणि 351(3), तसेच 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वणी पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करीत असून या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

“कोंबड्यांच्या झुंजीवर लाखोंची बाजी!” – पोलिसांची रेड आणि पळापळ

Comments are closed.