“कोंबड्यांच्या झुंजीवर लाखोंची बाजी!” – पोलिसांची रेड आणि पळापळ

जंगलात लपलेल्या कोंबड बाजारावर धाड, 6 जुगारी अटकेत, काही फरार

बहुगुणी डेस्क, वणी: दुपारच्या कोवळ्या उन्हात कुंभारखनी क्वार्टरजवळील जंगलसदृश भागात अवैध कोंबड बाजार रंगला होता. अचानक सिव्हील ड्रेसमधील पोलिसांनी धाड टाकली. एकच गोंधळ उडाला. कुणी दुचाकीवरून तर कुणी जंगलातील वाटा धरून पळू लागले. मात्र सहा जुगारी पोलिसांच्या हाती लागले आणि एक दुचाकीही जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे या कोंबडबाजारात वणी, मारेगाव व झरी तिन्ही तालुक्यातील जुगारी सापडले आहेत. या कारवाईत एक लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक सुयोग महापुरे यांना कुंभारखनीजवळ कोंबड बाजार सुरु असल्याची माहिती मिळाली. त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळ गाठले. यावेळी त्यांना तिथे राजरोसपणे कोंबड बाजार सुरु असल्याची खात्री पडली. त्यानंतर त्यांनी तिथे धाड टाकली. या कार्यवाहीत कैलास जगन पेंदोर (वय 30, रा. सुरला, ता. झरी-जामनी), धर्मा किसन परचाके (वय 43, रा. सुरला, ता. झरी-जामनी), उत्तम बोडकाजी ठाकरे (वय 55, रा. वेगाव, ता. मारेगाव), ऋषभ गजानन खुसपुरे (वय 28, रा. कोलगाव, ता. मारेगाव), शंकर शामराव वराटे (वय 32, रा. मारेगाव कोरंबी, ता. वणी), रमेश हिरामन झाडे (वय 40, रा. गणेशपूर, ता. वणी) हे पोलिसांच्या हाती लागले. तर काही जण फरार झाले.

पोलिसांनी कोंबड बाजारात जप्त केलेल्या मुद्देमालात 40,600 रुपये रोख, तीन कोंबडे (यापैकी एक जखमी), चार मोबाईल फोन, एक बजाज सिटी 100 मोटारसायकल (MH 29 BJ 4850) तसेच कोंबड्यांच्या पायाला बांधलेल्या लोखंडी धारदार कातींचा समावेश आहे. जप्त कोंबड्यांचा लिलाव करून 800 रुपये प्राप्त झाले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

आरोपींवर महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(ब) आणि 12(क) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वणी पोलिसांनी दिलेल्या या धाडसी कारवाईमुळे अवैध जुगार अड्ड्यांवर कठोर कारवाईचा स्पष्ट संदेश दिला आहे. दर रविवारी वणी परिसरात कोंबड बाजार चालतो. या कोंबड बाजारावरही कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

खळबळजनक – वणीतील एका पक्षाच्या नेत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

Comments are closed.