बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील साखरा गावात एका किरकोळ वादातून दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी झाली. सिमेंट रस्त्यावर उभ्या असलेल्या बाजांवरून व घरातील पाणी जाण्यापासून सुरू झालेला वाद थेट कुऱ्हाड, काठ्या आणि शिवीगाळपर्यंत पोहोचला. या घटनेत दोन्ही बाजूंचे नागरिक जखमी झालेत. सदर वाद हा गुरुवारी दिनांक 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास मारेगाव तालुक्यातील साखरा येथे झाला. या प्रकरणी एकमेकांविरोधात दिलेल्या तक्रारीवरून देवाळकर कुटुंबीय व बिलबिले कुटुंबियांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या तक्रारीनुसार, फिर्यादी पांडुरंग अंबादास देवाळकर (55) हे साखरा येथील रहिवासी आहे. त्यांच्या घराशेजारीच बिलबिले कुटुंबीय राहतात. देवाळकर हे त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर मालवाहूमध्ये कापूस भरत होते. कापूस भरून झाल्यावर त्यांना कापसाची गाडी न्यायची होती. मात्र त्यावेळी रस्त्यावर बिलबिले यांच्या घरासमोरील रस्त्यावर दोन खाट ठेवलेल्या होत्या. देवाळकर यांनी बिलबिले कुटुंबीयांनी रस्त्यावर ठेवलेल्या दोन खाटा हटवण्यास सांगितले.
मात्र यावरून वाद उफाळून आला. याच वादातून बिलबिले कुटुंबातील चौघांनी देवाळकर यांना पकडून मारहाण केली. त्यानंतर एकाने घरातून कुऱ्हाड आणून थेट पांडुरंग यांच्या डोक्यावर वार केला, त्यामुळे पांडुरंग गंभीर जखमी होऊन खाली कोसळले. ते पाहून त्यांची पत्नी, मुलगा व मुलगी मदतीला धावले. तर त्यांना देखील शिविगाळ करीत मारहाण करण्यात आली. या झटापटीत पांडुरंग यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन तुटून नुकसान झाले. असे तक्रारीत म्हटले आहे.
दुस-या तक्रारीनुसार, फिर्यादी देवानंद बिलबिले (48) यांच्या घरचे कपडे धुण्याचे पाणी शेजारी राहणा-या देवाळकर यांच्या घराकडे गेले. त्यामुळे त्यांचा पांडुरंग देवाळकर यांच्याशी वाद निर्माण झाला. वाद वाढताच देवाळकर यांची पत्नी, मुलगा व मुलगी शिविगाळ करत आले. त्यांनी बिलबिले यांच्या घरी धाव घेतली. त्यांनी बिलबिले कुटुबीयातील व्यक्तींना मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान देवानंद यांना पांडुरंग आणि त्यांच्या मुलाने कु-हाडीच्या लाकडी दांड्याने मारहाण केली. मारहाणीत कु-हाडीच्या लोखंडी पात्याने एकाच्या गुप्त जागी वार झाल्याने रक्तस्राव झाला. दरम्यान शेजारी मध्ये पडले व त्यांनी वाद थांबवला.
मारहाणीनंतर दोन्ही कुटुंबीयांनी मारेगाव पोलीस ठाणे गाठले. सर्वांचे मेडिकल करण्यात आले. पांडुरंग देवाळकर यांच्या तक्रारीवरून बिलबिले कुटुंबीयांवर कलम 118(1), 296, 115(2), 352, 351(2), 351(3), 324(4), 3(5) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला तर देवानंद बिलबिले यांच्या फिर्यादीवर कलम देवाळकर कुटुंबीयांवर 118(1), 352, 351(2), 351(3), 34 BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (इमेज एआय जनरेटेड)



Comments are closed.