बहुगुणी डेस्क, वणी: झरी तालुक्यातील शिबला गावात सोमवारी दुपारी घडलेल्या एका थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. अत्यंत अमानुष पद्धतीने सुरीने सपासप वार करत एका व्यक्तीचा निर्घृण खून करण्यात आला. या हल्ल्यात मृताचे हात धडापासून वेगळे होईपर्यंत वार केलेत. संतोष मानकू टेकाम (वय 45) असे या दुर्दैवी मृताचे नाव असून, पतीला वाचवण्याचा प्रयत्न करताना त्याची पत्नीही गंभीर जखमी झाली आहे. या धक्कादायक खूनप्रकरणातील आरोपी शालिक सिताराम आत्राम (वय 35) याला पोलिसांनी काही तासांत माथार्जून येथून अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, संतोष टेकाम हा शिबला गावात वास्तव्यास होता आणि त्याच्या घराच्या मागेच आरोपी शालिक आत्राम राहतो. दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जुन्या कारणावरून वाद सुरू होता. सोमवारी दुपारी 3 वाजताच्या सुमारास संतोष हा घरासमोरील अंगणात महाशिवरात्री निमित्त पुजेची तयारी करीत होता. दरम्यान तिथे शालिक सुरा (सत्तूर) घेऊन पोहोचला. शालिकने संतोषवर सुरीने अत्यंत क्रूरपणे वार करण्यास सुरुवात केली. संतोषला बचावाची संधीही मिळाली नाही. एकामागून एक घाव घालत आरोपीने त्याच्यावर सपासप हल्ला केला, ज्यात संतोषचा हाताचा पंजा शरीरापासून वेगळा झाला. तर डोकंही धडापासून वेगळं करण्याचा प्रयत्न केला.
पतीवर होणारा हल्ला पाहून संतोषची पत्नी मदतीसाठी धावून आली. मात्र आरोपीने तिलाही न जुमानता तिच्यावरही सुरीने वार केले. या झटापटीत ती गंभीर जखमी झाली. रक्तबंबाळ अवस्थेत संतोष जागीच कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. गावात काही वेळातच या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ शिबला येथे दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. गंभीर जखमी अवस्थेतील पत्नीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी बाहेरगावी रेफर करण्यात आले आहे.
दरम्यान, आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली. संध्याकाळपर्यंत आरोपी शालिक आत्राम हा माथार्जून परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. त्याच्यावर खुनासह गंभीर स्वरूपाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खुनामागचे ठोस कारण अद्याप समोर आलेले नसले तरी दोघांमधील जुना वाद आणि वैयक्तिक आकसातूनच हा रक्तरंजित प्रकार घडल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. शिबला गावात शांतता असली तरी या अमानुष घटनेमुळे भीती आणि संतापाचे वातावरण पसरले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.



Comments are closed.