बहुगुणी डेस्क, वणी: गांजा ओढणा-यांवर वणीत ठिकठिकाणी कारवाई करण्यात आली. वणी पोलिसांच्या पथकाने 4 ठिकाणी धाड टाकत काही गंजेड्यांना ताब्यात घेतले. दर एक दोन महिन्यात पोलिसांची गंजेड्यांवर कारवाई सुरु असते. मात्र नेहमीप्रमाणेच मोठा प्रश्न कायम — गांजाचा पुरवठा नेमका कोण करतो? सेवन करणारे पकडले जातात… पण सप्लाय करणारे नेमके कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गेल्या आठवड्यात 11 फेब्रुवारी रोजी शिरपूर पोलिसांनी धाड टाकून एमडी या ड्रग सप्लायरच्या मुसक्या आवळल्या होत्या. सोमवारी दिनांक 16 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ठाणेदार गोपाळ उंबरकर यांच्या मार्गदर्शनात व सहायक पोलीस निरीक्षक प्रियंका चौधरी यांच्या नेतृत्त्वात पेट्रोलिंग करून गंजेड्यांविरोधात धाडसत्र राबवण्यात आले.
पहिली कारवाई ही संध्याकाळी सव्वा 7 वाजता लालपुलिया परिसरात करण्यात आली. यावेळी लालपुलिया परिसरात असणा-या देशी दारूच्या भट्टीजवळ रंजन (25) रा. मस्जिद जवळ लालपुलिया हा चिलम ओढत होता. तो गांजा ओढत असतानाची खात्री झाल्यावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दुसरी कारवाई टिळक चौक येथे करण्यात आली. चौकातील विदर्भ नामक पानठेल्याच्या मागे प्रद्युम्न (वय 20 रा. साई मंदिर जवळ वणी) नामक एक तरुण गांजा ओढत होता. त्याला ताब्यात घेण्यात आले.
तिसरी कारवाई ही दीपक टॉकीज चौपाटी जवळ करण्यात आली. जत्रा मैदान येथे तीन तरुण गांजा ओढत होते. यावेळी पोलिसांनी धाड टाकून मोहसिन (वय 23 रा. शास्त्रीनगर वणी), संकेत (वय 24 रा. रंगनाथ नगर वणी), रोशन (वय 23 रा. रंगनाथ नगर वणी) यांना ताब्यात घेतले. तर चौथी कारवाई मंगळवारी दिनांक 17 रोजी संध्याकाळी निर्गुडा नदीच्या काठी करण्यात आली. गंगाविहार जवळील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ मनिष (वय 22 रा. छत्तीसगड हल्ली मुक्काम संतधाम मंदिर जवळ गणेशपूर) व भूषण (वय 25 रा. छत्तीसगड ह.मु. संतधाम मंदिर जवळ वणी) या दोघांना ताब्यात घेतले.
माल सप्लाय कोण करतो?
पोलीस पथक दर दोन महिन्यात धाडसत्र राबवून गंजेड्यांना ताब्यात घेते. गेल्या अनेक वर्षांपासून ही कारवाई सुरु आहे. पण मोठा प्रश्न मात्र तसाच अनुत्तरित राहतो — गांजाचा पुरवठा नेमका कोण करतो? गंजेड्यांनी हा माल कुठून आणला? त्यांना गांजा सप्लाय कोण करतो? जर माल कुठून आला याचा पत्ता पोलिसांना लागत नसेल तर गंजेडी घरीच गांजाचे उत्पादन करतात का? असा प्रश्न देखील यामुळे उपस्थित होत आहे. शहरात पुरवल्या जाणा-या गांजाचे पाळं मुळं पोलीस प्रशासन इतक्या वर्षात शोधता आले नाही. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, शहरात सहज उपलब्ध होणारा गांजा तेलंगणातून येतो. स्थानिक पातळीवरील पेडलरमार्फत हा माल व्यसनाधीन तरुणांपर्यंत पोहोचवला जातो, अशी माहिती आहे. ‘वणी बहुगुणी’ने वेळोवेळी हा मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र ठोस कारवाई होत नसल्याने एक प्रश्न वणीकरांमध्ये कायम आहे. सेवन करणारे पकडले जातात… पण सप्लाय करणारे नेमके कुठे आहेत?
धाडसत्रात पकडलेल्या सर्व आरोपींवर एनडीपीएस ऍक्टच्या कलम 8 सी व 27 अंतर्गत गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. सदर कारवाई ठाणेदार गोपाळ उंबरकर यांच्या मार्गदर्शनात, सपोनि प्रियंका चौधरी यांच्या नेतृत्त्वात पो.उपनि. सुदाम आसोरे, प.पोउनि शुभम मनवर, हे.कॉ. चिखले, पाटील, सुहास, लोकेश, शाम, इम्रान, मंदावार, घुगे, डडमल इत्यादींनी केली.

शहरातील ओसाड ठिकाणं बनले गर्दुल्यांचा अड्डा
शहरातील अनेक ओसाड ठिकाणी गांजासारख्या मादक द्रव्यांचे सेवन होते. यात शाळकरी मुलांपासून ते कॉलेजच्या तरुणांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. व्यसनाधीन झालेले या मुल व तरुणांना अनेक वर्षांपासून शहरातच गांजा मिळतो. हे सर्व चांगल्या घरातील मुलं असून या व्यसनामुळे त्यांची तरुणाई व्यर्थ जात आहे. गावाबाहेरील अनेक ओसाड लेआऊट, नदी रोडवरील मैदान, ओसाड बगिचा व मैदान हे सध्या गांजा फुकण्याचे ठिकाण झाले आहे. (इमेज एआय जनरेटेड)


Comments are closed.