बहुगुणी डेस्क, वणी: शिरपूर पोलिसांनी ड्रग्ज तस्करीच्या प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई केली. 11 फेब्रुवारीला ₹5.60 लाखांचे एमडी (मेफेड्रोन) जप्त करून पहिला आरोपी अटक केल्यानंतर, आता तिसऱ्या आरोपीला शुक्रवारी (20 फेब्रुवारी) दुपारी अटक करण्यात आली. रागीब अब्दुल अहमद रब (वय 25) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ₹60 हजार किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, शिरपूर पोलिसांना गोपनीय माहितीवरून ही कारवाई करण्याची संधी मिळाली. ठाणेदार संतोष मनवर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपी रागीब अब्दुल अहमद रब याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची किंमत बाजारात सुमारे ₹60 हजार इतकी आहे. या प्रकरणात आधीच दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पहिला आरोपी श्रेयस उर्फ गुड्डू शशिकांत पाटील (वय 24, रा. पुनवट) याला 11 फेब्रुवारीला ₹5.60 लाख किमतीचे 56.25 ग्रॅम एमडी जप्त करून अटक केली होती. त्यानंतर बुधवारी अक्षय बागदडे याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी तिसरी कारवाई करण्यात आली.
ड्रग्जमुक्त वणी कधी होणार?
हा प्रश्न आज प्रत्येक पालक, वणीकर व सुजाण नागरिकांच्या मनात घर करून बसला आहे. गांजा आणि एमडी (मेफेड्रोन) सारख्या घातक अंमली पदार्थांच्या विळख्यात वणीची तरुणाई अडकत चालल्याचे चित्र चिंताजनक आहे. शैक्षणिक वयातच युवक व्यसनाच्या आहारी जात असून त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर, कुटुंबावर आणि समाजावर गंभीर परिणाम होत आहेत. पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई होत असली तरी पुरवठ्याची साखळी पूर्णपणे मोडीत निघाली नाही, ही वस्तुस्थिती आहे. केवळ गांजा ओढणा-यांवर पोलीस कारवाई करते. ड्रग्जच्या साखळीचा सर्वात शेवटचा घटक हा पेडलर असतो. तो चिल्लर स्वरुपात ग्राहकांना माल पोहचवतो. मात्र आजपर्यंत एक साधा गांजा पेडलरही पोलिसांच्या हाती लागला नाही हे विशेष !
प्रकरणाची पार्श्वभूमी
11 फेब्रुवारीला शिरपूर-वणी मार्गावर चारगाव चौकीजवळ पोलिसांनी सापळा रचला होता. नागपूरहून पुनवटकडे येणाऱ्या श्रेयस पाटील याच्या Datsun Go (MH 32 AH 4126) कारची झडती घेतली असता, त्याच्या खिशात आणि कारच्या ड्रॉवरमध्ये तीन प्लास्टिक पिशव्यांमध्ये पांढरट-पिवळ्या रंगाची पावडर सापडली. ही पावडर एमडी असल्याचे आरोपीने कबूल केले. जप्त केलेल्या ड्रग्जसह 3 डिजिटल तराजू, एक रेडमी मोबाईल आणि वाहनासह एकूण ₹9.82 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. चौकशीत आरोपीने नागपूर येथील सप्लायरकडून ड्रग्ज घेतल्याचे आणि वणी येथील डिलिव्हरीसाठी नेत असल्याचे सांगितले होते.
या संपूर्ण प्रकरणात आता तीन आरोपींना अटक झाली आहे. शिरपूर पोलिसांनी एनडीपीएस कायद्यांतर्गत कलम 8(क), 21(क), 22(क) आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार संतोष मनवर यांनी प्रकरणाचा सखोल तपास करून सर्व संबंधित आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल. असा इशारा दिला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संतोष मनवर, पोलिस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने, इकबाल शेख, प्रशांत झोड, पंकज कुडमेथे, परमेश्वर दराडे, सुनील दुबे, विजय फाळके यांच्या पथकाने केली. तपास सुरू असून, आणखी अटका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Comments are closed.