25 वर्षांनी पुन्हा रंगल्या आठवणी: विवेकानंद विद्यालयात स्नेहमिलन सोहळा
2001-02 बॅचच्या विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी आणि शालेय आठवणींचा संगम
विवेक तोटेवार, वणी: वणीतील विवेकानंद विद्यालयात तब्बल 25 वर्षांनंतर माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र आले आणि जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेहमिलन सोहळा उत्साहात साजरा केला. रविवार, 12 एप्रिल रोजी सत्र 2001-02 मधील इयत्ता 10 वी (क) चे विद्यार्थी आपल्या शाळेत जमले आणि बालपणाच्या गोड आठवणींमध्ये हरवून गेले. शिक्षण, नोकरी आणि संसाराच्या व्यापामुळे वर्षानुवर्षे दूर राहिलेल्या मित्र-मैत्रिणींनी या निमित्ताने एकत्र येत भावनिक क्षण अनुभवले. मिठ्या, आनंदाश्रू आणि जुन्या आठवणींनी वातावरण भारावून गेले.
स्नेहमिलनाच्या पूर्वसंध्येला सर्व विद्यार्थ्यांनी रणजीत रामटेके यांच्या संकल्पनेनुसार पळसोनी येथील सद्गुरु बाजीराव महाराज वृद्धाश्रमाला भेट देऊन तेथील ज्येष्ठ नागरिकांसोबत वेळ घालवला. सामाजिक बांधिलकी जपत त्यांना किराणा साहित्य भेट देण्यात आले व आशीर्वाद घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शारीरिक शिक्षक हरिभाऊ चिखले होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी वर्गशिक्षक व सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक रामकृष्ण बोबडे उपस्थित होते. यावेळी यामिनी शर्मा, जनार्धन जुमनाके, प्रेमदास राठोड, राम पवार, पुरुषोत्तम पिटलावार, जगदिश ठावरी, संतोष बेलेकर आणि गजानन राठोड आदी शिक्षकांची उपस्थिती लाभली.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. गुरुजनांचे औक्षण, सन्मान व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला. दिवंगत शिक्षक व सहाध्यायांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत शाळेला भेटवस्तू प्रदान केली. शिक्षकांनी मनोगतात विद्यार्थ्यांनी सुजाण नागरिक बनून समाजात नाव कमवावे, हीच खरी कमाई असल्याचे सांगत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही आपल्या आयुष्यातील प्रवास व शालेय आठवणी सांगत भावनांना वाट मोकळी करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उज्वला वनकर शेंडे यांनी केले, प्रास्ताविक राकेश बरशेट्टीवार यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन सचिन पेटकर यांनी केले. या स्नेहमिलन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी सर्व मित्र-मैत्रिणींनी परिश्रम घेतले.



Comments are closed.