वणी तालुक्यात 20,000 वर्षांपूर्वीच्या दुर्मिळ जीवाश्मांचा खजिना सापडला
वणीमध्ये हत्ती, बायसन, हरिण आणि मानवी जीवाश्म! प्रा. सुरेश चोपणे यांचा मोठा शोध
पुरुषोत्तम नवघरे, वणी: यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील जुगात आणि आपटी गावाजवळ वर्धा नदीच्या किनाऱ्यावर अतिशय दुर्मिळ जीवाश्म सापडले आहेत. भूशास्त्र आणि पुरातत्व संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी केलेल्या संशोधनात गेल्या वर्षी हत्तीचे जीवाश्म आणि यंदा बायसन, हरिण, रानडुक्कर (वाइल्ड बोअर) यांच्यासह काही मानवी अल्प जीवाश्म आणि पाषाणयुगीन अवजारे आढळली आहेत.
ही जीवाश्मे शेवटच्या हिमयुगीन काळातील (प्लेइस्टोसीन) सुमारे 20,000 वर्षांपूर्वीची असल्याचे प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले. जागतिक पृथ्वी दिनाच्या निमित्ताने त्यांनी ही महत्त्वाची माहिती दिली.
प्रा. चोपणे यांच्या म्हणण्यानुसार, वर्धा नदीजवळ आढळलेल्या जीवाश्मांमध्ये बायसनचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यासोबत हरिणाची हाडे, रानडुक्कराचे दात, मानवी हाडे आणि पाषाणयुगीन अवजारे मिळाली आहेत. या अवजारांमुळे पाषाणयुगीन मानव या प्राण्यांची शिकार करत असल्याचे पुरावे मिळाले आहेत. ही जीवाश्मे महाराष्ट्रात प्रथमच आढळली असून, भूशास्त्र विभागालाही अशा प्रकारचे नमुने यापूर्वी सापडले नव्हते.
सुमारे 20,000 वर्षांपूर्वी हिमयुग संपत असताना प्रचंड महापूर आला. त्यात विदर्भातील अनेक प्राणी नदीत वाहून गेले आणि नदीच्या गाळात गाडले गेले. कालांतराने ते जीवाश्मात रूपांतरित झाले. वणी, मारेगाव, वरोरा आणि चंद्रपूर तालुक्यातील वर्धा नदीकाठावर अशा गाळाच्या थरांमध्ये हे जीवाश्म सापडले आहेत.
प्रा. सुरेश चोपणे हे 1995 पासून भूशास्त्रीय संशोधन करत आहेत. त्यांच्या प्रमुख शोधांमध्ये150 कोटी वर्षांपूर्वीचे स्ट्रोमॅटोलाइट, 20 कोटी वर्षांपूर्वीचे वृक्ष आणि पानांचे जीवाश्म,6 कोटी वर्षांपूर्वीचे डायनोसॉर अवशेष, विविध शंख-शिंपले यांचा समावेश आहे. आता सापडलेले 20,000 वर्षांपूर्वीचे जीवाश्म त्यांच्या सुरेश चोपणे रॉक म्युझियममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.
प्रा. चोपणे यांनी सांगितले की, वणी तालुका भूशास्त्र आणि जीवाश्मांच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. अलीकडील प्राण्यांची अशी जीवाश्मे भारतात क्वचितच आढळतात. विद्यार्थी आणि संशोधकांसाठी शासकीय जीवाश्म संग्रहालयाची अत्यंत गरज आहे. सध्या ते विसापूर येथील बोटॅनिकल गार्डनमध्ये स्वतःच्या प्रयत्नाने भौगोलिक संग्रहालय उभारण्यास मदत करत आहेत.
या शोधामुळे विदर्भातील भूशास्त्रीय वारसा अधिक समृद्ध झाला असून, वणी तालुक्याचे नाव देशाच्या भूशास्त्रीय नकाशावर अधिक ठळकपणे उमटले आहे.



Comments are closed.