बहुगुणी डेस्क, वणी: शहरात पुन्हा एकदा घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली असून चोरट्यांनी बंद घर हेरून तब्बल 2.30 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वणी येथील मंगलमूर्ती पार्क, प्लॉट क्र. 42, गणेशपूर परिसरात राहणारे 59 वर्षीय रामरतन सिताराम हरडे (व्यवसाय: नोकरी, WCL) यांच्या घरात ही घटना घडली. 21 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4 वाजेपासून ते 22 एप्रिल 2026 रोजी दुपारी 3 वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्याने घरातील मौल्यवान सोन्याचे दागिने चोरून नेले.
फिर्यादीनुसार, चोरट्याने एकूण 76 ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले. यात दोन सोन्याच्या बांगड्या (वजन 40 ग्रॅम, किंमत 1,20,000 रुपये), एक सोन्याचा गोप (वजन 20 ग्रॅम, किंमत 60,000 रुपये), दोन सोन्याच्या अंगठ्या (वजन 10 ग्रॅम, किंमत 30,000 रुपये) तसेच कानातील सोन्याचे लटकण (वजन 6 ग्रॅम, किंमत 20,000 रुपये) यांचा समावेश आहे. चोरी गेलेल्या मालाची एकूण किंमत 2,30,000 रुपये इतकी आहे.
या प्रकरणी रामरतन हरडे यांनी 23 एप्रिल 2026 रोजी रात्री 12:29 वाजता वणी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली. पोलिसांनी कलम 331(3), 331(4) आणि 305(a) BNS अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोउपनि साजिद सैय्यद करत आहेत.



Comments are closed.