वणीत गोवंश तस्करीविरोधात पोलिसांची सलग धाड

17 आरोपींवर गुन्हे, 18 जनावरे व वाहने जप्त

बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यात गोवंश जनावरांची क्रूर पद्धतीने वाहतूक करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी सलग कारवाया करत एकूण 17 आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. विविध ठिकाणी करण्यात आलेल्या या कारवाईत 18 गोवंश जनावरे तसेच लाखो रुपये किमतीची वाहने जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यांतर्गत हे गुन्हे नोंदविले आहेत. मोहर्ली गावाजवळ, वणी रोड रेल्वे क्रॉसिंग, ड्रीम लॅन्ड सिटी परिसर तसेच संविधान चौक येथे स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. 

दि. 28 एप्रिल 2026 रोजी मोहर्ली गावाजवळ तीन वाहनांमधून 7 गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून तीन पिकअप वाहनांसह सुमारे 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर दि. 03 मे 2026 रोजी मोहोर्ली गावातून वणीकडे येणाऱ्या टाटा इन्ट्रा वाहनातून एक बैल व दोन गोऱ्ह्यांची क्रूर पद्धतीने वाहतूक करताना दोन आरोपींवर कारवाई करण्यात आली. या प्रकरणात जनावरे व वाहन असा एकूण सुमारे 1.81 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दि. 05 मे 2026 रोजी पहाटे ड्रीम लॅन्ड सिटी, मुर्धानी रोड परिसरात पोलिसांनी आणखी एक कारवाई करत दोन बैलांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईत टाटा इन्ट्रा वाहनासह सुमारे 1.80 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याच दिवशी सकाळी संविधान चौक, वरोरा रोड परिसरात पोलिसांनी मोठी धाड टाकून चार वाहनांमधून गोवंश जनावरांची वाहतूक करणाऱ्या आठ आरोपींवर कारवाई केली. या कारवाईत 8 जनावरे व चार वाहने असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी जनावरांना आखूड दोऱ्यांनी बांधून वाहनांमध्ये कोंबून नेत होते. जनावरांसाठी चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. तसेच वाहतूक व जनावरांबाबत आवश्यक कागदपत्रेही आरोपींकडे आढळून आली नाहीत. या सर्व प्रकरणांचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू असून गोवंश तस्करीविरोधात कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

Comments are closed.