बहुगुणी डेस्क, वणी: वणी शहरात पहिल्यांदाच महिला चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याचे समोर आले असून बेलदारपुरा परिसरातील बंद घर फोडून सुमारे 70 हजार रुपयांची भांडी चोरी करण्यात आली. विशेष म्हणजे, चोरी करून पोत्यामध्ये मुद्देमाल नेताना चार महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 7 मे रोजी तक्रार नोंदवण्यात आली असून चार महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस तपास करीत आहे.
तक्रारीनुसार, श्रीमती राजामणी पृथ्वीराज चव्हाण (55) या वणीतील बेलदारपुरा येथील रहिवासी आहे. त्या दि. 05 एप्रिल 2026 रोजी निजामाबाद जिल्ह्यातील माहेरी गेल्या होत्या. त्यांनी घराच्या समोरील बाजूस कुलूप लावण्यात आले होते, तर मागील बाजूचा दरवाजा तुटलेला असल्याने विटा लावून बंद करण्यात आला होता.
दि. 23 एप्रिल रोजी शेजारील महिलेने फोन करून घराच्या मागील बाजूचे दार उघडे दिसत असल्याची माहिती दिली. त्यानंतर राजामणी चव्हाण या तातडीने वणी येथे परतल्या. घरात पाहणी केली असता आतील कुलूप तुटलेले दिसून आले तसेच घरातील पितळ, तांबे, स्टील व जर्मनची विविध जुनी भांडी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.
चोरीस गेलेल्या वस्तूंमध्ये पितळी समई, परात, तांब्याचे हांडे, जर्मन गंज, कढई, कुकर, मिक्सर, फॅन तसेच इतर लहान-मोठ्या भांड्यांचा समावेश असून एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे 70 हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
सीसीटीव्हीत चोरट्या महिला कैद
घरफोडी प्रकरणातील चार अनोळखी महिला घरातून चोरीचा मुद्देमाल पोत्यामध्ये भरून नेताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाल्या आहेत. दि. 21 एप्रिल रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजता आरोपी महिला घरातून बाहेर पडताना दिसत आहे. तसेच त्यांच्या हातात पोते दिसून येत आहे. या घटनेतून पहिल्यांदाच महिला चोरट्यांची टोळी सक्रीय असल्याचे समोर आले आहे. पोलिसांकडून फुटेजच्या आधारे त्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
या प्रकरणी वणी पोलिसांनी चार अज्ञात आरोपी महिलांविरोधात बीएनएस कलम 305 (अ), 331 (3) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.


Comments are closed.