बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यात अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना समोर आली असून या प्रकरणी मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस माहितीनुसार, बेपत्ता मुलगी ही 17 वर्ष 9 महिने वयाची असून नुकतीच 12 वी उत्तीर्ण झाली आहे. दि. 07 मे रोजी रात्री कुटुंबातील सर्व सदस्य जेवण करून झोपले होते. मात्र दि. 08 मे रोजी सकाळी सुमारे 6 वाजता उठून पाहिले असता मुलगी घरात आढळून आली नाही. रात्री 1 ते सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान ती घरातून निघून गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
प्रियकराने पळवल्याचा संशय
मुलीचे तालुक्यातीलच एका युवकासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती मुलीच्या वडिलांना मिळाली. संबंधित युवकाच्या घरी चौकशी केली असता तोदेखील रात्रीपासून बेपत्ता असल्याचे समोर आले. यावरून संबंधित युवकानेच मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे.
या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 137(2) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.


Comments are closed.