सावधान ! आठवडी बाजारात मोबाईल चोरट्यांचा धुमाकूळ

फोन पे मधून लाख रुपये लंपास.... 7 मोबाईल चोरीच्या घटना

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगावच्या गजबजलेल्या आठवडी बाजारात सराईत मोबाईल चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून गेल्या काही दिवसांत तब्बल ७ मोबाईल चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमुळे व्यापारी, शेतकरी आणि बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे एका नागरिकाच्या मोबाईलमधील फोन-पे अॅपचा गैरवापर करून चोरट्यांनी तब्बल ₹१ लाखांहून अधिक रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Birthday

मिळालेल्या माहितीनुसार, गत मंगळवारी आठवडी बाजारात गोंडबुरांडा येथील उत्तम पुंडलिक गमे यांचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. मोबाईल चोरीनंतर चोरट्यांनी त्याचा लॉक उघडून फोनमधील आधार कार्ड आणि बँकिंग माहितीचा वापर करत ऑनलाइन व्यवहार सुरू केले.
शुक्रवारी सायंकाळी विविध व्यवहारांद्वारे ₹३० हजार, ₹४० हजार, चार वेळा ₹५ हजार आणि शेवटी ₹१० हजार अशी एकूण ₹१ लाखांपेक्षा अधिक रक्कम खात्यातून काढण्यात आली. दरम्यान, खात्यातून पैसे वळते होत असल्याचे मेसेज येताच उत्तम गमे यांनी तत्काळ कस्टमर केअरशी संपर्क साधून खाते ब्लॉक केले. त्यामुळे खात्यातील उर्वरित सुमारे ₹१.५ लाखांची रक्कम वाचली. मात्र या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

याशिवाय, कोलगाव येथील सुनील आस्वले यांचाही मोबाईल बाजारात चोरीला गेला असून त्यांच्या खात्यातूनही सुमारे ₹७ हजारांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. सलग घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे आठवडी बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये आणि ग्राहकांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे.

चोरटे झाले डिजिटल साक्षर
मोबाईल चोरीच्या घटनांनी आता अधिक धोकादायक स्वरूप धारण केले आहे. पूर्वी चोरटे केवळ मोबाईल चोरून त्याची विक्री करत असत, मात्र आता ते डिजिटल व्यवहारांचेही तंत्र शिकल्याचे दिसून येत आहे. चोरी केलेल्या मोबाईलमधील PhonePe, Google Pay, बँकिंग अॅप्स आणि आधारसारख्या कागदपत्रांचा गैरवापर करून खात्यातील पैसे लंपास करण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे मोबाईल चोरी ही आता केवळ वस्तू चोरी न राहता थेट आर्थिक फसवणुकीचे मोठे माध्यम बनत चालली असून नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

स्थानिक नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी पोलिस प्रशासनाकडे बाजार परिसरात विशेष बंदोबस्त, सीसीटीव्ही देखरेख आणि नियमित पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी केली आहे. वाढत्या मोबाईल चोरीच्या घटनांमुळे बाजारात येणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Comments are closed.