वणी बसस्थानकात महिलेची हरवली बॅग… खाकीची तत्परता….
हरवलेली बॅग मिळाली सुरक्षित; पोलीस शिपाई रितेश यांचे कौतुक
बहुगुणी डेस्क, वणी : “पोलीस म्हणजे केवळ कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा नसून जनतेचा विश्वास जपणारे खरे रक्षकही असतात,” याचा प्रत्यय वणी येथे आला. वणी बस स्थानक परिसरात हरवलेली बॅग तत्परतेने शोधून तिच्यातील रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षितपणे मालकिणीकडे सुपूर्द करत वणी पोलीस स्टेशनच्या एका पोलीस शिपायाने खाकीची अब्रू उंचावली आहे.

हिंगणा तालुक्यातील टाकडघाट येथील पूजा वीरू राऊत (वय 28) या रविवारी (दि. 24 मे) दुपारी वणी बस स्थानकावर आल्या होत्या. गडबडीदरम्यान त्यांची हँडबॅग हरवली. बॅगमध्ये महत्त्वाची कागदपत्रे तसेच रोख रक्कम असल्याने त्यांनी परिसरात शोधाशोध केली. मात्र बॅग न सापडल्याने त्या चिंतेत पडल्या.
दरम्यान, वणी पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई रितेश हे कर्तव्यावर असताना त्यांना बस स्थानक परिसरात बेवारस अवस्थेत ही बॅग आढळली. बॅगमध्ये रोख रक्कम असल्याचे लक्षात आल्यानंतरही कोणताही मोह न बाळगता त्यांनी तत्काळ वरिष्ठांना माहिती दिली आणि बॅगेच्या मूळ मालकाचा शोध सुरू केला.
काही वेळातच पूजा राऊत यांचा शोध लागल्यानंतर पोलीस शिपाई रितेश यांनी बॅगेतील सर्व वस्तू व रोख रक्कमेची खातरजमा करून ती सुरक्षितपणे त्यांच्या ताब्यात दिली. हरवलेली बॅग परत मिळाल्यानंतर पूजा राऊत यांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे मनापासून आभार मानले. “बॅगमध्ये महत्त्वाची कागदपत्रे आणि पैसे होते. पोलिसांनी इतक्या प्रामाणिकपणे ती परत केल्याने खूप विश्वास वाटला,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
वणी पोलिसांच्या या प्रामाणिक कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत असून एका साध्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कर्तव्यनिष्ठेमुळे खाकी वर्दीवरील जनतेचा विश्वास पुन्हा दृढ झाला आहे.



Comments are closed.