दीपक चौपाटी परिसरातील वरळी मटका अड्ड्यावर छापा

वणी पोलिसांची कारवाई; जुगार साहित्य व नगदी जप्त

विवेक तोटेवार, वणी: शहरातील दीपक चौपाटी परिसरात सुरू असलेल्या अवैध वरळी मटका जुगार अड्ड्यावर वणी पोलिसांनी धाड टाकून एका आरोपीला ताब्यात घेतले. ही कारवाई सोमवार दि. 25 मे 2026 रोजी दुपारी सुमारे 2 वाजताच्या सुमारास करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक शुभम महानवर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नगर परिषद कॉम्प्लेक्सजवळ छापा टाकण्यात आला. यावेळी अवैधरित्या वरळी मटका जुगार चालवित असलेला मंगल सदाशिव तामगाडगे (रा. शास्त्रीनगर, वणी, जि. यवतमाळ) याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

कारवाईदरम्यान आरोपीकडून वरळी मटका जुगाराचे साहित्य तसेच ₹1,100 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. या प्रकरणी वणी पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम 12(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम महानवर, पोहवा कावडे, पोलीस कॉन्स्टेबल डडमल व दळवे यांच्या पथकाने पार पाडली.

शहरातील अवैध धंद्यांविरोधातील कारवाया अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती पोलिसांना देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.