वादळी पावसाचा तडाखा; शेतातील गोरा-बैल जागीच ठार

शेती हंगामाच्या तोंडावर अल्पभूधारक शेतकऱ्याचे मोडले कंबरडे

बहुगुणी डेस्क, वणी: मारेगाव तालुक्यातील हिवरा शेतशिवार गुरुवारी (दि. 28 मे) सायंकाळी विजांच्या प्रचंड कडकडाटाने हादरून गेले. अचानक कोसळलेल्या विजेने एका अल्पभूधारक शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून शेतात बांधून ठेवलेला गोरा व बैल जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेमुळे शेतकरी मंगल जनार्धन खिरटकर (रा. चोपण) यांच्यावर दुहेरी आर्थिक संकट कोसळले आहे.

Birthday

मिळालेल्या माहितीनुसार, मंगल खिरटकर यांनी स्वतःच्या अवघ्या 3 एकर शेतीसोबतच मक्त्त्याने आणखी 5 एकर शेती घेत यंदाच्या खरीप हंगामाची तयारी सुरू केली होती. गुरुवारी सायंकाळी सुमारे 5 वाजताच्या सुमारास परिसरात अचानक वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यावेळी ठेक्याच्या शेतातील कडूनिंबाच्या झाडाखाली गोरा व बैल बांधलेले होते. अचानक आकाशातून वीज कोसळताच दोन्ही जनावरे क्षणार्धात मृत्युमुखी पडली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

घटनेनंतर शिवारात एकच खळबळ उडाली. शेतकरी मंगल खिरटकर यांनी घटनास्थळी धाव घेतली असता दोन्ही जनावरे मृत अवस्थेत दिसून आली. खरीप हंगामाच्या तोंडावरच शेतीची सर्व मदार असलेली जनावरे गेल्याने त्यांच्या कुटुंबासमोर मोठे संकट उभे ठाकले आहे.

विशेष म्हणजे, आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या या अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्ज आणि मक्त्त्याच्या भरोशावर शेतीची मशागत सुरू केली होती. मात्र निसर्गाच्या अवकृपेने काही क्षणांतच त्यांचे लाखोंचे नुकसान झाले. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, संबंधित महसूल व पशुसंवर्धन विभागाने तातडीने पंचनामा करून शासनाकडून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि शेतकरी बांधवांकडून करण्यात येत आहे.

Comments are closed.