मार्डा डॅम मर्डर मिस्ट्री सॉल्व, धक्कादायक कारण समोर !

तिघांनी केला एकाचा गेम, एक छोटीशी चूक अन आरोपी अडकले

बहुगुणी डेस्क, वणी: दांडगाव शिवारातील मार्डा धरण परिसरात 5 जून रोजी एक अनोळखी इसमाचा मृतदेह जंगलात सापडला होता. मात्र मारेगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासांत प्रकरण उघडकीस आणत तीन आरोपींना शिताफीने जेरबंद केले. विनोद प्रल्हादराव साहरे (35, रा. मरेगाव चक, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) असे मृताचे नाव असून प्रवीण वर्धने (वय 25 रा. आपटी ता. मारेगाव) राजू नथ्थुजी ढेंगळे (वय 35 रा. दांडगाव ता. मारेगाव) आणि शंतनू झाडे (18, रा. नागरी, ता. वरोरा) असे आरोपीची नावं आहेत. 

काय आहे मर्डर मिस्ट्री? 
प्राथमिक माहितीनुसार, ५ जून रोजी दांडगाव (ता. मारेगाव) शिवारातील मार्डा धरण परिसरात गौतम ठमके यांच्या शेतालगतच्या जंगलातील खड्यात एका अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. फॉरेन्सिक पथक, फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि श्वानपथकाच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने ओळख पटवणे मोठे आव्हान होते. मात्र पोलिसांनी विविध दिशांनी तपास सुरू ठेवला. तीन स्वतंत्र तपास पथके तयार करून शोधमोहीम राबविण्यात आली. तपासादरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील नागरी गावात मृत व्यक्तीची ओळख विनोद प्रल्हादराव साहरे (35, रा. मरेगाव चक, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) अशी पटली.

अशी झाली मर्डर मिस्ट्री सॉल्व !
मृताची ओळख पटल्याने तपास सोपा झाला. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या मदतीने मृत शेवटच्या वेळी कुणासोबत होता याची माहिती काढली. त्यावरून आरोपी प्रवीण वर्धने (वय 25 रा. आपटी ता. मारेगाव) राजू नथ्थुजी ढेंगळे (वय 35 रा. दांडगाव ता. मारेगाव) आणि शंतनू झाडे (18, रा. नागरी, ता. वरोरा) यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्हा कबूल केला. आरोपीने त्याच्या बहिणीला होणारा त्रास थांबवण्यासाठी इतर दोघांना सोबत घेत हत्या केल्याचे समोर आले. 

या प्रकरणी मारेगाव पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1), 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक संतोष मनवर, प्रमोद जिधेवार, फौजदार दिगंबर किनाके, इकबाल शेख, राजन इसनकर, सागर दीपेवार, अजय वाभिटकर आदींनी तपासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. पोलिसांच्या या जलद आणि परिणामकारक कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.

Comments are closed.