विवेक तोटेवार, वणी: रात्रीचा काळोख, मुंगोली खदान परिसरातील निर्मनुष्य रस्ता आणि पोलिसांनी रचलेला सापळा… काही क्षणांतच पोलिसांच्या नजरेस संशयास्पद हालचाली करणारा एक इसम पडला. तपासात त्याच्याकडे गावठी बनावटीचे देशी पिस्तूल (कट्टा) आणि जिवंत काडतुसे (किंमत 52 हजार रुपये) सापडली. शाहरुख गुलशेर खान (वय 31) असे आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शाहरुख उर्फ फावडा गुलशेर खान (वय 31) हा घुग्गुस जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी आहे. पोलिसांना गुप्त सूत्रांद्वारे माहिती मिळाली की शनिवारी दिनांक 13 जून रोजी रात्री शाहरुख हा देशी कट्टा घेऊन चोरी करण्यासाठी मुंगोली खाण परिसरात जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पोलिसांनी रात्री खाण परिसरात सापळा रचला. रात्री 9.45 वाजता मुंगोली ते वर्धा नदी पुलाकडे जाणाऱ्या मार्गावर एक संशयित व्यक्ती दिसला.
पोलिसांनी त्याला थांबविले. चौकशीदरम्यान तो घाबरल्याचे दिसून आले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे देशी पिस्तूल (कट्टा) आणि 2 जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी तत्काळ शस्त्रे ताब्यात घेत संशयिताला ताब्यात घेतले. त्याला विचारणा केली असता त्याने त्याचे नाव शाहरुख गुलशेर खान (वय 31, रा. आझाद वॉर्ड क्र. 2, घुग्घुस, जि. चंद्रपूर) असे सांगितले. या कारवाईत पोलिसांनी देसी कट्टा किंमत ₹50 हजार, तर दोन जिवंत काडतुसांची किंमत ₹2 हजार असा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध शस्त्र अधिनियम कलम 3/25 सह कलम 135 व 123 अंतर्गत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलिस अधिकारी वणी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शिरपूर पोलिस ठाण्याचे ठाणेदार सपोनि संतोष मनवर, पोउनी धीरज गुल्हाने, इकबाल शेख पोहेकॉ/अविनाश बनकर, पोहेकॉ/सुनील दुबे, पोकॉ/पंकज कुडमेथे, पोकॉ/दिपक वाकडे, पोकॉ/किरण दासरवार आणि पोकॉ/फुलचंद नाईक व इतर कर्मचाऱ्यांनी ही यशस्वी कारवाई केली.



Comments are closed.