सलग दोन दिवस मारला चोरट्याने शेतात डल्ला

शेतकऱ्यांची सिंचन व्यवस्था चोरट्यांच्या निशाण्यावर

बहुगुणी डेस्क, वणी: शेतातील मोटार सुरू करण्यासाठी सकाळी गेलेल्या शेतकऱ्याला जमिनीत गाडलेली केबलच गायब झाल्याचे पाहून धक्का बसला. विशेष म्हणजे एका दिवसातच दोन टप्प्यांत केबल चोरीची घटना घडल्याने चोरट्यांनी थेट शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेलाच लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, विजय रामाजी गाडगे (वय 49) हे भगतसिंग चौक, वणी येथील रहिवासी असून शेती व्यवसाय करतात. त्यांचे मुर्धानी शेतशिवारात शेत आहे. शेतातील पिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी मोटार बसविण्यात आली असून त्यासाठी 2.5 MM क्षमतेची 170 मीटर लांबीची केबल जमिनीत टाकण्यात आली होती.

25 जून रोजी सायंकाळी शेतातील काम आटोपून ते घरी परतले. दुसऱ्या दिवशी 26 जून रोजी सकाळी सुमारे 8:00 वाजता मोटार सुरू करण्यासाठी शेतात गेले असता जमिनीत टाकलेली सुमारे 100 मीटर केबल गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पाहणी केली असता बोअरजवळील ठिकाणी जमीन उकरून केबल कापून चोरी केल्याचे दिसून आले.

दुस-या दिवशी पुन्हा चोरी निदर्शनास
विजय दुस-या दिवशी 27 जून रोजी पुन्हा सकाळी शेतात गेले. तिथे गेल्यावर आणखी 70 मीटर केबलही जमिनीतून उखडून चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आढळले. अशा प्रकारे एकूण 170 मीटर लांबीची 2.5 MM क्षमतेची केबल, अंदाजे ₹20,000 किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

घटनेनंतर विजय गाडगे यांनी वणी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 303(2), 331(4) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Comments are closed.